इंदू मिलमध्ये साकारतंय प्रेरणास्थानाचं भव्य रूप, थर्माकॉल मॉडेलचं काम पूर्ण; कसा असणार बाबासाहेबांचा पुतळा?
मुंबई: मुंबईच्या हृदयात, दादर येथील ऐतिहासिक इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक आकार घेत आहे. सुमारे 450 फूट उंचीच्या या स्मारकात बाबासाहेबांचा 350 फूट उंचीचा भव्य पुतळा उभा राहणार असून, त्यासाठी तब्बल 1395 टन धातू लागणार आहे.
या स्मारकासाठी तयार केलेलं थर्माकॉलचं 230 फूट उंच मॉडेल पूर्ण झालं असून, त्यावर आधारित मूळ पुतळ्याच्या निर्मितीला आता गती मिळाली आहे. सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या कारखान्यात सध्या मूर्तीचे काम सुरू असून, 155 मेट्रिक टन धातूच्या बेसप्लेटचे काम पूर्ण झाले आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मार्फत उभारलं जाणारं हे स्मारक 12 एकर जागेवर उभं राहत आहे. यामध्ये 100 फूट उंचीची पादपीठ इमारत असून त्यावर बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात येणार आहे.
हा प्रकल्प 2018 मध्ये सुरू झाला असला तरी, काही कारणांमुळे कामाला विलंब झाला आहे. आता हे स्मारक डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर 2026 मध्ये लोकांसाठी खुले होण्याची अपेक्षा आहे.
प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च 1090 कोटी रुपये आहे. दरम्यान, स्मारकाचे काम संथ गतीने सुरू असल्याने, बाबासाहेबांचे अनुयायी असंतोष व्यक्त करत आहेत. तथापि, स्मारकाच्या उभारणीसाठी सरकारकडून आता अधिक प्रयत्न सुरू आहेत.