मुख्यमंत्री फडणवीस यांनी बदलापूर-कर्जत रेल्वे विस्तार प्रकल्पासाठी पंतप्रधानांचे मानले आभार
रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे स्थानिक आर्थिक विकासाला चालना
मुंबई: केंद्र सरकारच्या ‘पीएम गतिशक्ती’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत ‘नेटवर्क प्लॅनिंग गटाच्या’ 89 व्या बैठकीत बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाच्या विस्तारास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे मुंबई-पुणे-सोलापूर-वाडी-चेन्नई मार्गावरील वाढत्या प्रवासी आणि मालवाहतुकीमुळे होणाऱ्या विलंबावर मोठा उपाय होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. 32.460 किमी लांबीच्या या ब्राउनफिल्ड प्रकल्पामुळे बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी आणि कर्जत यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांमध्ये कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत होईल.‘पीएमजीएस एनएमपी’च्या उद्दिष्टांशी सुसंगत असलेल्या या प्रकल्पामुळे स्थानिक पायाभूत सुविधांचा विकास होईल. यामुळे कार्यक्षमता वाढून प्रवासी आणि व्यापारी वाहतुकीस गती मिळणार आहे. या विस्तार प्रकल्पामुळे मुंबई महानगर आणि कर्जतपर्यंत रेल्वेसेवेचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगवान होणार आहे.