भाजप पदाधिकाऱ्यांची BMC कार्यालयात भेट, अधिकाऱ्यांवर लाचखोरीचा आरोप
धारावीत SRA घुसखोरी प्रकरणावर तक्रार, अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी धारावीतील मुस्लिम नगर भारतीय S.R.A. सोसायटी, 90 फूट रोड (कुंभारवाडा समोर) येथे गेली चार वर्षे अनधिकृतरित्या घुसखोरी करून राहत असलेल्या व्यक्तीवर SRA मार्फत महानगरपालिका G/North दादर कार्यालयाने निष्कासनाची ऑर्डर काढली होती. मात्र, तरीही महानगरपालिका अधिकारी लाच घेत असल्याचा आरोप होत असून, घुसखोरांना अभय दिले जात असल्याचे समोर आले आहे.
या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन संताप व्यक्त केला. कॉलनी ऑफिसर यांना जबाबदारीस धरून त्यांच्या कार्यालयात भीक मागून गोळा केलेल्या पैशाची चिल्लर उधळण्यात आली. तसेच सहाय्यक आयुक्त श्री. आंबी यांची भेट घेऊन कॉलनी ऑफिसरच्या भूमिकेवर तक्रार करण्यात आली. यावेळी त्यांनी लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
ही बैठक भारतीय जनता पक्ष धारावी विधानसभा पदाधिकारी आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली. यात मंडळ अध्यक्ष गोवर्धन चौहान, अनिल कटके, राजू केणी (वॉर्ड अध्यक्ष), एम. पी. मुरगन (वॉर्ड अध्यक्ष), राजू अंबाटोर, काळू कुंचीकोर्वे, शामू मेत्रे, विनायक पवार, अनिल ओरनी, श्रीनिवास वांकानोल आणि अनोखा निंगेरी यांचा समावेश होता.
या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड आणि आमदार कॅप्टन तमील सेलवन यांच्याकडे योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.