Virar Building Collapse: लेकीचा पहिला वाढदिवस, पण ती रात्र ठरली अखेरची; विरारच्या दुर्घटनेत मायलेकीचा मृत्यू
वसई-विरार: विरारमध्ये एक इमारत कोसळल्याने भीषण अपघात झाला असून त्यात 17 जणांचा मृत्यू तर 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. रमाबाई अपार्टमेंटचा भाग चाळींवर कोसळला आहे. या अपार्टमेंटमधील 50 घरांपैकी 12 घरं कोसळली आहेत. मंगळवारी रात्री ही दुर्घटना घडली आहे. बचाव कार्य युद्धीपातळीवर सुरू आहे.
चिमुकलीचा दुर्देवी अंत दरम्यान, विरार पूर्व भागातील नारंगी येथील जोवील परिवार त्यांची चिमुकली उत्कर्षाचा पहिला वाढदिवस साजरा करत होते. यावेळी जोवील परिवाराने घराला सजवले, केक कापला आणि फोटो काढून नातेवाईकांना पाठवला. या उत्साह आणि आनंदाच्या क्षणाला नजर लागली. चिमुकलीने केक कापल्याच्या पाच मिनिटांनंतर रमाबाई अपार्टमेंटचा मागचा भाग चाळीवर कोसळला. या घटनेत छोटी उत्कर्षा, तिची आई आरोही जोवील यांचा दुर्देवी मृत्यू झाला.
इमारत चाळीवर कोसळ्याने चाळ उद्धवस्त विरार येथे रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा मागील भाग चाळीवर कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या काही लोकांना बाहेर काढलं. घटनास्थळी जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी पाहणी करून बचाव कार्याचा आढावा घेतला. इमारतीचा मागचा भाग शेजारी असणाऱ्या चाळीवर कोसळल्याने चाळ उद्ध्वस्त झाली असून अनेक रहिवासी ढिगाऱ्याखाली दबले गेले असल्याची शक्यता आहे.
कोसळलेल्या इमारतीच्या अपार्टमेंटमध्ये एकूण 50 सदनिका होत्या त्यापैकी 12 सदनिका कोसळल्या असून ढिगाऱ्याखाली 15 ते 20 लोक अडकले असावेत अशी भीती व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांना दुर्घटनेची माहिती मिळताच बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले. त्यानुसार वसई-विरार महानगरपालिका अग्निशमन दल व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) घटनास्थळी तात्काळ दाखल झाले व रात्रीपासूनच मदत व बचावकार्य सुरू केले.
या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेत 9 जण जखमी आहेत. मृत 3 जणांची ओळख पटली असून 2 जणांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. लक्ष्मण सिंग, आरोही ओंकार जोवील, उत्कर्षा जोवील यांचा मृत्यू झाला आहे. प्रमिला प्रभाकर शिंदे, प्रेरणा शिंदे, प्रदीप कदम, जयश्री कदम, मिताली परमार, संजय स्वपंत सिंग, मंथन शिंदे, विशाखा जोवील, प्रभावकर अशी दुर्घटनेतील जखमींची नावे आहेत. 3 जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून, 6 जणांवर उपचार सुरू आहेत.