Govinda Died In Mankhurd: आनंदाचा उत्सव शोकांतिका ठरला; मानखुर्दमध्ये दहीहंडी सरावादरम्यान गोविंदाचा मृत्यू
Govinda Death in Mankhhurda: राज्यभरात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष सुरू असताना मानखुर्दमध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. महाराष्ट्र नगर परिसरात 32 वर्षीय गोविंदाचा दहीहंडी सरावादरम्यान मृत्यू झाला. आनंदाचा आणि उत्साहाचा हा सोहळा अचानक शोकमय बनल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव जगमोहन चौधरी असून ते एका बाल गोविंदा पथकाशी जोडलेले होते. दुपारी दहीहंडीच्या सजावटीसाठी आणि दोर बांधण्यासाठी ते वर चढले होते. मात्र, अचानक तोल जाऊन ते खाली पडले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.घटनेची बातमी कळताच महाराष्ट्र नगर परिसरात शोककळा पसरली. उत्सवाच्या दिवशी अशा प्रकारची दुर्घटना घडल्याने गोविंदा पथकातील सदस्यांसह स्थानिक नागरिकांत दुःखाचे वातावरण आहे. हेही वाचा: Janmashtami 2025: तेजस्विनी महिला गोविंदा पथकाने फोडली दादरची दहीहंडी मुंबईत 30 गोविंदा जखमी
दहीहंडी फोडण्यासाठी अनेक ठिकाणी गोविंदा पथके उत्साहात सहभागी झाली होती. मात्र, उत्सवाचा जोश आणि गर्दीच्या वातावरणात अनेक ठिकाणी अपघातांच्या घटना समोर आल्या. दुपारी 3 वाजेपर्यंतच्या माहितीनुसार, मुंबईत विविध ठिकाणी एकूण 30 गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी 15 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला असून, उर्वरित 15 जणांवर अद्याप विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
ठाण्यात सातव्या थरावरून गोविंदा खाली पडला
मुंबईबरोबरच ठाण्यातील एका दहीहंडी कार्यक्रमातही अपघात झाला आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी आयोजित केलेल्या 8 थरांच्या दहीहंडीमध्ये सातव्या थरावर चढलेला एक गोविंदा तोल जाऊन खाली पडला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हेही वाचा: Dahi Handi 2025 Kokan Nagar Govinda Pathak: कोकण नगर गोविंदा पथकाने मोडला 'जय जवान'चा रेकॉर्ड सरकारकडून वारंवार सावधगिरीचे आवाहन
दरवर्षी दहीहंडीच्या निमित्ताने अनेक गोविंदा जखमी होतात, त्यामुळे सरकार आणि स्थानिक प्रशासन वारंवार सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करते. उंच थर रचताना योग्य प्रशिक्षण, हेल्मेट, सुरक्षाकवच यांचा वापर करणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी सरकारकडून गोविंदांसाठी विमा योजना जाहीर करण्यात आली असून, जखमींचा उपचार खर्च सरकार उचलते.
आनंदाच्या उत्सवात दुःखाचा काळा अध्याय
दहीहंडी हा महाराष्ट्राचा पारंपरिक आणि उत्साहाचा उत्सव असला, तरी मानखुर्दसारख्या घटना वारंवार या उत्सवाला गालबोट लावत आहेत. जगमोहन चौधरी यांच्या निधनामुळे मानखुर्द आणि मुंबईत हळहळ व्यक्त होत आहे. जखमी गोविंदांचे लवकर बरे होण्यासाठी सर्वत्र प्रार्थना व्यक्त केली जात आहे.