Mumbai Monorail Accident : मोठा अपघात टळला ! अचानक मोनोरेल एका बाजूला झुकली, प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु
संपूर्ण मुंबईमध्ये साध्या पावसामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. वाढलेल्या पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानदेखील झाले आहे. अनेक सखल भागात पाणीदेखील साचले आहे. त्याचप्रमाणे अतिमुसळधार पावसाने मुंबईची जान असलेल्या लोकल ट्रेनचे वेळापत्रकदेखील कोलमडले आहे. त्यामुळे आता कामावर असलेल्या नोकरदार वर्गाला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. अशातच आता अचानक एक नवीन बातमी समोर आली आहे.
दिवसभर लोकलने प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्रास होत असतानाच मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड घडून आला. तसेच मोठा अपघात होता होता राहिला. मुंबईमध्ये संध्याकाळी चेंबूर ते भक्ति पार्क स्टेशनच्या मध्ये मोनोरेल अचानक बंद पडली. यामध्ये 150 पेक्षा अधिक प्रवासी अडकल्याची माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे ही मोनोरेल एका बाजूने झुकल्याचेदेखील सांगण्यात आले.
हेही वाचा - Mumbai Mithi River flood Alert : मिठी नदीने धोका पातळी ओलांडली; नागरिकांचं स्थलांतर, भीतीचं वातावरण
मोनोरेलमधील प्रवाशांनी आपत्कालीन विभागाला कॉल केल्यानंतर लवकरच आम्ही मदतीला पोहोचत आहोत, असे सांगितले जात आहे. आता हा आपत्कालीन क्रमांक बंद येत असल्याचाही दावा प्रवाशांकडून केला जातोय. ही मोनोरेल नेमकी का थांबवण्यात आली, याचे ठोस कारण अद्याप समजू शकलेले नाही.
मोनोरेल अचानकपणे थांबल्यानंतर प्रवाशांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला आहे. काही प्रवाशांनी पोलिसांनाही कॉल करण्याचा प्रयत्न केला. काही प्रवाशांनी अग्निशमन दलालाही कॉल केला असल्याची माहिती समोर आली आहे.