भारतीय हवामानशास्त्र विभागाने 12 ऑगस्ट रोजी मुंबईस

Mumbai Weather Forecast: मुंबईत आज मध्यम ते मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

Mumbai Weather Forecast: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली होती. परंतु, आता मान्सूनची सक्रियता पुन्हा तीव्र झाली आहे. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने 12 ऑगस्ट रोजी मुंबईसह आसपासच्या भागात वादळांसह मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, शहर आणि कोकण किनारपट्टीसाठी पिवळा अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या अहवालानुसार, 12 ऑगस्ट रोजी बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढू शकते. यामुळे 12 ते 14 ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर अधिक वाढेल अशी शक्यता आहे.

मुंबईतील सायन, कुर्ला, परळसह सखल भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवासाचे काळजीपूर्वक नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. प्रवाशांनी अतिरिक्त वेळ द्यावी आणि पूरप्रवण भागात जाणे टाळावे, असा सल्लाही स्थानिक अधिकाऱ्यांनी दिला आहे. 

हेही वाचा - Mumbai Local Train : मुंबई लोकल ट्रेनचे स्वयंचलित दरवाजे केवळ स्थानकांमध्ये उघडतील; प्रवाशांची सुरक्षा वाढणार

कोकणात मुसळधार पाऊस - 

कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 12 आणि 13 ऑगस्टला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषतः 13 ऑगस्टला कोकणातील बहुतेक भागांत पावसाची जोरदार शक्यता आहे. विदर्भात 15 ऑगस्टपर्यंत नागपूर, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यांत ढगाळ वातावरण व हलका ते मध्यम पाऊस पडेल.

हेही वाचा - Vasai-Virar Tragedy: वसईतील धुमाळ नगरमध्ये विहिरीत पोहताना 17 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता - 

याशिवाय, मराठवाडा, लातूर, नांदेडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर छत्रपती संभाजीनगर, जालना, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतही हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागांत ढगगडाटी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने पुढील 5-7 दिवस महाराष्ट्रात हवामान सक्रिय राहण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.