Mumbai: गोरेगावमध्ये 27 कोटी खर्चून बांधलेला उड्डाणपूल 6 वर्षात पाडला जाणार; महापालिकेच्या निर्णयाने नागरिकांमध्ये संताप
मुंबई: मुंबई महानगरपालिकेने गोरेगाव पश्चिमेतील वीर सावरकर उड्डाणपूल पाडून नवीन बांधण्याची योजना आखली आहे. परंतु स्थानिक रहिवाशांना हे मान्य नाही. हा उड्डाणपूल 2018 मध्ये 27 कोटी रुपये खर्चून बांधला आणि तेव्हापासून परिसरातील वाहतुक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. हा उड्डाणपूल मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या मार्गात येत आहे, म्हणून तो पाडणे आवश्यक असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.
मालाड पश्चिममधील काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी महापलिकेच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. सरकार निवडणुकीपूर्वी महापलिकेच्या निधीतून शक्य तितके पैसे काढत आहे. हा पूल पाडल्याने वाहतूक आणखी वाढेल. त्यामुळे महापालिकेने या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि पर्याय शोधावा.
त्याचवेळी, एएलएम माइंडस्पेस मालाडचे अध्यक्ष शहजाद रुस्तमजी यांनीही याला चुकीचे पाऊल म्हटले. ते म्हणाले की जर हा उड्डाणपूल पाडला गेला तर महामार्गावर पोहोचण्यासाठी 45 मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळ लागेल. याचा परिणाम रिअल इस्टेटच्या किमती आणि स्थानिक व्यवसायावर होईल. महापालिकेने या निर्णयावर पुन्हा विचार करण्याची गरज आहे.
उड्डाणपूल पाडण्याची गरज आहे का? मुंबई कोस्टल रोड आणि गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या प्रस्तावित फेज-2 च्या कनेक्शनमध्ये हा उड्डाणपूल अडथळा ठरत आहे असा महापालिकेचा युक्तिवाद आहे. मात्र जेव्हा हा उड्डाणपूल बांधला गेला तेव्हा कोस्टल रोड प्लॅन अस्तित्वात नव्हता. आता नवीन वाहतूक नेटवर्क लक्षात घेता, माइंडस्पेस आणि दिंडोशीला जोडणारा डबल-डेकर उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
सध्याची परिस्थिती काय? सध्या हा उड्डाणपूल गोरेगाव आणि मालाडला थेट पश्चिम द्रुतगती महामार्गाशी जोडतो आणि प्रवासाचा वेळ 45 मिनिटांवरुन 10 मिनिटांपर्यंत कमी करण्यात आला आहे. तो कोसळल्याने पश्चिम उपनगरांमध्ये मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते.