मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नेहमीप्रमाण

रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर होणार मेगा ब्लॉक; 'A' ते 'Z' माहिती आधीच जाणून घ्या

मुंबई: मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनने दररोज लाखो लोक प्रवास करतात. अशातच, मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नेहमीप्रमाणे, अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी येत्या रविवारी मेगा ब्लॉक होणार आहे. याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. रेल्वे प्रशासनाने माहिती दिली की, 'मध्य रेल्वे, मुंबई विभागामार्फत येत्या रविवारी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे. माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:05 पासून ते दुपारी 03:45 पर्यंत मेगा ब्लॉक होणार आहे'. 

रेल्वे प्रशासनाने अशी माहिती दिली की, 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 3 ऑगस्टला सकाळी 10:36 पासून ते दुपारी 03:10 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील ट्रेन माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. यानंतर, त्या त्यांच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील आणि 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. तसेच, ठाणे पलीकडे जाणाऱ्या जलद ट्रेन मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील'. 

3 ऑगस्टला ठाणे येथून सकाळी 11:03 ते 3:38 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील ट्रेन मुलुंड स्थानकावर अप धिम्या मार्गावर वळवल्या जाऊन मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

हेही वाचा: करून करून भागले, आता देवपूजेला लागले?; विजय वडेट्टीवारांनी साधला योगेश कदमांवर निशाणा

हार्बर मार्गावर 'मेगा ब्लॉक'

3 ऑगस्ट रोजी सकाळी 11:10 पासून ते दुपारी 04:10 पर्यंत मेगा ब्लॉक असेल. यावेळी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10:34 पासून दुपारी 03:36 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील ट्रेन रद्द राहतील. तसेच पनवेल/बेलापूर/वाशी येथून 10:16 पासून ते दुपारी 03:47 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील ट्रेन रद्द राहतील.

मेगा ब्लॉकमुळे, येत्या रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी मार्गांदरम्यान विशेष उपनगरीय ट्रेन चालविण्यात येणार आहे. यासह, मेगा ब्लॉक काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10:00 पासून ते सायंकाळी 6:00 पर्यंत ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच, रेल्वे प्रशासनाने अशी माहिती दिली की, 'पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल मेगा ब्लॉक आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे'.