एमआरव्हीसीकडून निधी न मिळाल्यास ३२ स्थानके केवळ का

मध्य-पश्चिम रेल्वेवर 32 स्थानकांना मंजुरी, निधीअभावी कामे ठप्प

निधीअभावी 32 नवीन रेल्वे स्थानकांचे भविष्य अनिश्चित

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे क्षेत्राच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) मार्फत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विविध सुधारणा प्रकल्प राबवले जातात. यात अद्ययावत लोकल डब्यांची निर्मिती, 12 ऐवजी 15 डब्यांच्या लोकलसाठी फलाटांची लांबी वाढवणे आणि नवीन रेल्वेमार्ग बांधणीसाठी निधी पुरवला जातो.

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने अलीकडेच 32 नवीन रेल्वे स्थानकांच्या बांधकामाला तत्त्वतः मंजुरी दिली आहे. मात्र, या प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी आवश्यक निधीची तरतूद अद्याप झालेली नाही. त्यामुळे ही स्थानके सध्या कागदावरच राहिली आहेत. ठाणे रेल्वे प्रवासी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी या प्रकल्पांसाठी निधीची तरतूद एमआरव्हीसीने करावी, अशी विनंती मंडळाचे अध्यक्ष विलास वाडेकर यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे.

यामध्ये माटुंगा-सायन मार्गावर मुख्य लाईनवरील किंग सर्कल स्थानक बांधून हार्बर लाईनवरील किंग सर्कल स्थानकाला स्कायवॉकने जोडण्याचा प्रस्ताव आहे. तसेच कोपरी, खारेगाव, कासगाव, चामटो, गुरवली, वेल्होळी, वसई-कोपर-पनवेल मार्गावर पायेगाव, डुंगे, कलवार, पिंपळास, नांदिवली, आगासन, पलावा, निरवली, निघू, पेंढार, टॅबोडे, नवीन पनवेल, खारपाडा, पेण-कासू दरम्यान वडखळ आणि पश्चिम रेल्वेवर वाघवी, सारतोडी, माकून्सर, चिंतूपाडा, खराळे रोड, पांचाली, बीएसईएस कॉलनी यांसारख्या ठिकाणी स्थानकांची उभारणी प्रस्तावित आहे.

या 32 स्थानकांना तत्त्वतः मंजुरी मिळाली असली तरी त्यासाठी रेल्वे अर्थसंकल्पात निधीची तरतूद केलेली नाही. त्यामुळे हे प्रकल्प निधीअभावी रखडण्याची भीती आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर स्वतःच्या निधीतून नवीन स्थानकांची उभारणी करणे कठीण असल्याने 1965 मध्ये कांजूरमार्ग स्थानकाची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतरच्या 60 वर्षांत मध्य रेल्वेवर टिळकनगर, नाहूर, कोपर, उंबरमाळी, तानशेत, दिघा (ट्रान्स हार्बर) आणि पश्चिम रेल्वेवर राममंदिर अशी फक्त सातच स्थानके उभारली गेली आहेत. त्यातील टिळकनगर आणि कोपर ही स्थानके रेल्वे प्रशासनाच्या सोयीसाठी उभारण्यात आली आहेत.