Raj Thackeray : 'नक्की कोण जिंकलं आणि कोण हरलं?'; भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यावरून शाह पिता-पुत्रावर राज ठाकरेंची मार्मिक टीका
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि त्यांचे पुत्र आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. हे व्यंगचित्र आज सकाळी राज ठाकरे यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करण्यात आले आहे. जे सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यांच्या पारंपरिक ठाकरे शैलीतील व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रांवर थेट टीका केली गेली आहे.
या व्यंगचित्रामध्ये नुकताच झालेला भारत-पाकिस्तान आशिया कप सामना आणि त्यासोबतच्या विरोधाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, कोण जिंकलं? आणि कोण हरलं?
व्यंगचित्रात गृहमंत्री अमित शाह हात बांधून उभे असल्याचे दिसत आहे, तर आयसीसी अध्यक्ष जय शाह मृत्यूमुखी पडलेल्या पहलगाम हल्ल्यातील नागरिकांना सामना जिंकल्याची माहिती देताना दाखवले आहे. या माध्यमातून राज ठाकरे यांनी क्रिकेट आणि राजकीय घटनांमधील विसंगतीवर टिप्पणी केली आहे.
राज ठाकरे यांनी हॅशटॅगसह ही पोस्ट फेसबुक आणि इतर समाज माध्यमांवर शेअर केली आहे. सोशल मीडियावर या व्यंगचित्राला तुफान प्रतिसाद मिळत आहे. अनेक नेटकरी व्यंगचित्रावर आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करत असून, काहींनी टीकेतून तर काहींनी विनोदातून प्रतिसाद दिला आहे. या व्यंगचित्रातून राज ठाकरे यांनी केवळ राजकीय परिस्थितीवर टीका केली नाही, तर सामाजिक आणि खेळासंबंधी घटनांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.