अलिबाग: चालकाचे नियंत्रण सुटून एसटी बसची दुसऱ्या एसटीला धडक, दोन एसटीमध्ये चिरडून 17 वर्षीय मुलाचा मृत्यू; नागरिक संतप्त
अलिबाग: पनवेलहून अलिबागला येणाऱ्या एसटी बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने, त्याने बस स्थानकासमोर एका दुचाकी, तीन आसनी रिक्षा आणि समोरील एसटी बसला धडक दिली. या अपघातात 17 वर्षीय दुचाकीस्वाराचा दोन्ही बसच्या मध्ये चिरडून मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले.
अलिबाग शहरात दोन एसटी बसच्या मध्ये चिरडून 17 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला याची माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले. संतप्त जमावाने दोन्ही बसेसची दगडफेक करून तोडफोड केली. बस चालकाला आमच्या ताब्यात द्या, म्हणून अशी मागणी करत वाहतूक रोखून धरली. त्यामुळे अलिबाग शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. जयदीप शंकर बना असे या अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
हेही वाचा - CIBIL Scoreचा वापर करून गाड्या चोरण्याची भन्नाट शक्कल, कारची शोरूममधून खरेदी आणि काळ्या बाजारात विक्री..
पोलीसांनी जमावास शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र सतप्त जमाव ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हता. अपघाताचे चित्रिकरण करण्याचा प्रय़त्न करणाऱ्यांनाही संतप्त जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागले. अलिबाग पोलीसांसह, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस मुख्यालयातील वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. संतप्त जमावाकडून एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी शिघ्र कृती दलाला पाचारण करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
अपघातानंतर चिडलेल्या जमावाला रोखण्यासाठी शिघ्र कृती दल आणि दंगल नियंत्रण पथकासही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अप्पर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवथरे यांच्यासह, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.
ही परिस्थिती लक्षात घेऊन आंबेडकर चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी दोन्ही बाजूची वाहतूक पोलीसांनी रोखून धरली होती. या परिसरातील दुकाने आणि हॉटेल्सही काही काळ बंद करण्यात आली आहे. अलिबाग आगारातून होणारी एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली.