हिंगोली जिल्ह्यात वीज पडून महिला शेतकऱ्याचा मृत्यू

राज्यात 19 ते 25 मे दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाचे थैमान

महाराष्ट्र: राज्यात पुढील आठवड्यात 19 ते 25 मे दरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकण भागात याचा विशेषतः प्रभाव जाणवणार आहे. मागील काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जीवितहानीच्या घटना घडल्याने चिंता वाढली आहे.

हिंगोली जिल्ह्यात विजेचा घातक प्रहार; महिला शेतकऱ्याचा मृत्यू

हिंगोली जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून सतत अवकाळी वादळी वाऱ्यांसह पावसाने हैराण केले आहे. काल सायंकाळी सेनगाव तालुक्यातील पार्टी पोहकर शिवारात वीज पडून मुक्ताबाई रामजी गिरी (वय 40) या महिला शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्या आपल्या शेतात काम करत असताना अचानक वादळी वाऱ्याने परिसरात गडगडाट सुरू झाला आणि विजेचा फटका त्यांना बसला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. याच भागात विजेचा एक बैलही मृत्युमुखी पडला, तर गुगुळ पिंपरी शिवारात सात शेळ्यांचा मृत्यू झाल्याने नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. हेही वाचा: मुंबईत रेल्वे प्रवाशांसाठी युरोपीय थाट; मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाचा आंब्यावर परिणाम; तळ कोकणात यलो अलर्ट

प्रादेशिक हवामान खात्याने तळ कोकणासाठी 20 मेपर्यंत यलो अलर्ट जाहीर केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून आणि आज सकाळी अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. वैभववाडी, तरळे, कणकवली आणि बांदा या भागांमध्ये पावसाची नोंद झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतीचे काम ठप्प झाले असून आंब्याच्या उत्पादनावरही त्याचा परिणाम झाला आहे. उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा खरा

बुलढाणा जिल्ह्यात देखील काल सायंकाळपासून ढगाळ वातावरण होते. रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे फळबागांना मोठा फटका बसणार असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला होता, त्यात बुलढाण्याचा समावेश आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

इतर भागांतही पावसाचा जोर

मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, तर विदर्भातील अकोला, यवतमाळ, अमरावती या भागांत देखील वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसामुळे शाळा-महाविद्यालये, बाजारपेठांवर परिणाम झाला आहे. शेती कामांवरही मोठा परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्यात मान्सूनपूर्व हवामान बदलाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर जाणवत असून शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक ठरणार आहे. सरकारकडून नुकसानभरपाईसाठी लवकर निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.