Ajit Pawar NCP: मुंबई महापालिका सोडता इतर ठिकाणी स्वबळावर..., राष्ट्रवादीची मोठी घोषणा
नागपूर: सर्वाेच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात निर्णय घेतला आहे. जानेवारी 2026 अखेरपर्यंत स्थाानिक स्वराज्य संंस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयानंतर सगळेच राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे शिबिर नागपुरात संपन्न होत असताना राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात मोठी घोषणा केली. मुंबई महापालिका निवडणूक वगळता महाराष्ट्रात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचा स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय प्रफुल पटेल यांनी जाहीर केला.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने नाशिकमध्ये कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळावा घेऊन पक्षाला उभारी दिली आहे. भाजप पक्षानेही मुंबईत कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करून 'मुंबई आपलीच' असा नारा दिला. पाठोपाठ अजित पवार यांच्या पक्षाचेही नागपुरात शिबिर सुरू आहे. शिबिराच्या पहिल्याच दिवशी महापालिका आणि स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाने स्वबळावर लढण्याची घोषणा केली.
पक्ष वाढवायचा म्हटल्यावर निवडणुकांत अनेकांना संधी द्यावी लागते. अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येच खऱ्या अर्थाने पक्षवाढ होत असते. त्यामुळे मुंबई वगळता आमच्या पक्षाने उर्वरित महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. मुंबईबाहेर उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक नेत्यांना युती करायची असेल तर ते नक्कीच करू शकतात मात्र आम्ही पक्ष स्तरावरून महायुती म्हणूनच लढा, असे आदेश देणार नसल्याचे प्रफुल पटेल म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या सरकारमध्ये आहे. तिन्ही पक्ष उत्तमरित्या सरकार चालवत आहे. राष्ट्रवादीचे आठ मंत्री सरकारमध्ये आहेत. पण संबंधित मंत्र्यांचे हवे तेवढे लक्ष पक्षसंघटनेकडे नाही, अशी तक्रार खुद्द पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी बोलून दाखवली. नागपुरात सुरू असलेल्या शिबिरात मंत्र्यांना पक्षसंघटनेकडे लक्ष द्यावेच लागेल अशा सूचना प्रफुल पटेल यांनी दिल्या आहेत.