अमित शाहांनी चार मंत्र्यांना डच्चू देण्याचे सुचवले त्यात कोकाटेंचं नाव; खासदार राऊतांचा खळबळजनक गौप्यस्फोट
मुंबई: महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सध्या रमी गेममुळे चर्चेत आहेत. कोकाटे यांचा विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केला आहे. यामुळे चर्चांणा उधाण आले आहे. यावर कुणी रमी खेळतंय, तर कुणी आमदार निवासात मारामाऱ्या करतंय असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच अमित शाहांनी चार मंत्र्यांना डच्चू देण्याचे सुचवलं त्यात कोकाटेंचं नाव असल्याचा खळबळजनक खुलासा खासदार राऊत यांनी केला आहे.
'शेतकऱ्यांना भेटायला कृषिमंत्र्यांना वेळ नाही'
शेतकऱ्यांना भेटायला कृषिमंत्र्यांना वेळ नाही. गेल्या काही काळापासून कृषिमंत्र्याची विधानं सगळ्यांनी पाहिली. अशा आमदारांना कृषी मंत्रीपद देऊन सरकारने महाराष्ट्राला कोणते योगदान दिले असा सवाल राऊतांनी सरकारला केला आहे. कोणाचे व्हिडीओ पैशाच्या पेटीबरोबर तर कोणाचे व्हिडीओ खेळताना तर कोण चड्डी बनियान वर मारामारी करतात ही महाराष्ट्राची परिस्थिती अशी टीकाही त्यांनी केली आहे.
अमित शाह चार मंत्र्यांना डच्चू देणार? अमित शाह यांनी चार मंत्र्यांना डच्चू देण्याचे सुचवले आहे, त्या यादीत कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचे देखील नाव आहे. अमित शाहांनी चार ते पाच मंत्र्यांना वगळण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांना केल्या आहेत. एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीला देखील सूचना दिल्या आहेत. ज्यात कृषीमंत्र्यांचं देखील नाव आहे याची मला पक्की माहिती आहे असा दावा खासदार राऊत यांनी केला आहे.
आमदार रोहित पवारांनी केलेली पोस्ट
“#जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…!”
सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामचं नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतरची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.