Mahua Moitra vs Amit Shah : देशाच्या गृहमंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य, महुआ मोईत्रा संसदेत हे काय बोलून गेल्या
Mahua Moitra On Amit Shah: राजकारणातील भाषेचा स्तर पुन्हा एकदा खालावल्याचे उदाहरण समोर आले आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. महुआ मोईत्रा यांनी एका कार्यक्रमात भाषण करताना संतापाच्या भरात म्हटलं, 'जर देशात सतत घुसखोरी होत असेल आणि सीमांचे रक्षण करण्यात अपयश येत असेल, तर सर्वप्रथम गृहमंत्री अमित शहांचे डोके कापून टेबलावर ठेवले पाहिजे.'
महुआ मोईत्रा यांचा युक्तिवाद
पश्चिम बंगालमध्ये बेकायदेशीर घुसखोरीच्या मुद्द्यावरून त्यांनी केंद्र सरकारला जाब विचारला. सीमेचे रक्षण कोण करत आहे? बीएसएफ कोणाच्या अखत्यारीत आहे? गृह मंत्रालयाच्या. मग जबाबदारी त्यांचीच आहे, असंही महुआ मोईत्रा यांनी म्हटलं आहे. तथापी, महुआ यांनी पंतप्रधान मोदींच्या 15 ऑगस्टच्या भाषणाचाही उल्लेख केला. त्यांनी म्हटलं की, 'पंतप्रधान बोलत असताना, समोर बसलेले गृहमंत्री फक्त दात दाखवत होते आणि टाळ्या वाजवत होते.'
हेही वाचा - Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी केली देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका; म्हणाले, 'गरज असेल तेव्हा...'
महुआ मोईत्रा यांनी सीमा सुरक्षा दलाच्या भूमिकेवरदेखील प्रश्न उपस्थित केले. त्या म्हणाल्या, जर देशाच्या सीमांचे रक्षण करणारे कोणी नसेल आणि हजारो-लाखो लोक घुसखोरी करत असतील, तर सर्वप्रथम तुम्ही अमित शहा यांचे डोके कापून टेबलावर ठेवावे. बीएसएफ येथे काय करत आहे? आम्हाला बीएसएफची भीती वाटते. आम्हाला येथे कोणताही घुसखोर दिसत नाही.
दरम्यान महुआ यांच्या विधानाबाबत, संदीप मजुमदार नावाच्या भाजप कार्यकर्त्याने नादिया कोतवाली पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. मोदी सरकार सध्या देशातील बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्या स्थलांतरितांविरुद्ध विशेष ऑपरेशन राबवत आहे. या पार्श्वभूमीवर महुआ मोईत्रा यांचे वक्तव्य समोर आल्याने राजकीय वातावरण आणखी तापले आहे.