बच्चू कडू यांना 3 महिन्यांची शिक्षा अन् लगेच जामीन मंजूर; नेमकं प्रकरण काय?
मुंबई: राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच, एक मोठी अपडेट समोर आली आहे. माजी आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांना मंगळवारी दोषी ठरवले आणि त्यांना तीन महिन्यांसाठी कारावासाची शिक्षा मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाने सुनावली. 2018 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली मंगळवारी विशेष सत्र न्यायालयाने बच्चू कडू यांना दोषी ठरवले आणि तीन महिन्यांसांठी कारावासाची शिक्षा सुनावली.
बच्चू कडूंवर असलेल्या आरोपांमुळे त्यांना दोषी ठरवत अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी बच्चू कडूंना तीन महिन्यांसाठी कारावासाची शिक्षाही सुनावली आणि 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. विशेष न्यायालयाने बच्चू कडू यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देईपर्यंत स्थगिती दिली आहे. यासह, त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला आहे. बच्चू कडू यांना कलम 353 आणि 506 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. मात्र, न्यायालयाने त्यांना जाणूनबुजून अपमान केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले.
हेही वाचा: Today's Horoscope: 13 ऑगस्टला कोणत्या राशींना अडचणींचा सामना करावा लागेल? जाणून घ्या
न्यायालयाची प्रतिक्रिया
'सरकार किंवा एखाद्या विभागाच्या व्यवस्थापनाबद्दल किंवा सरकारच्या भरती प्रक्रियेदरम्यान परीक्षा आयोजित करण्याबाबत तक्रारी असू शकतात. मात्र, याचा अर्थ असा नाही की कोणताही प्रतिनिधी एका अशा अधिकाऱ्याकडे जाईल आणि त्यांच्यावर हल्ला करेल किंवा त्यांना धमकावून त्यांचे काम थांबवेल', अशी प्रतिक्रिया न्यायालयाने दिली. 'फक्त आरोपी आमदार आहे, म्हणून त्याला कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला धमकावण्याचा किंवा त्याच्या कार्यालयात हल्ला करण्याचा अधिकार नाही', असे न्यायाधीश म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
26 सप्टेंबर 2018 रोजी, माजी आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी मुंबईतील माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे तत्कालीन संचालक आयएएस अधिकारी प्रदीप पी यांच्या कार्यालयाला भेट दिली होती. दरम्यान, एसपीएससी परीक्षा देणारे बच्चू कडू महापोर्टलमधील त्रुटीबद्दल चौकशी करण्यासाठी गेले होते. तेव्हा, बच्चू कडू आणि तात्कालीन महाराष्ट्र राज्य संचालक असलेले पी प्रदीप यांच्यात वाद झाला. तेव्हा, बच्चू कडू यांनी त्यांच्यावर आयपॅड फेकले होते. यावर, पी प्रदीप यांनी बच्चू कडूंविरोधात तक्रार दाखल केली होती.