पुण्यामध्ये आयोजित होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची भेट

पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर असताना, भाजपचे ज्येष्ठ आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांची विशेष भेट घेतली. पुण्यामध्ये आयोजित होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाल्याची माहिती स्वत: पडळकर यांनी दिली.

देशभरात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि संघ परिवाराच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याबरोबर, महाराष्ट्रासह देशभरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या भक्तांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून पुण्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार आहे. त्या संदर्भात गोपीचंद पडळकर यांनी पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री आणि प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन, 'आपण कार्यक्रमाला यावं', अशी विनंती करत त्यांना निमंत्रण दिले. या भेटीबद्दलची माहिती स्वत: पडळकर यांनी दिली. यामध्ये, केवळ सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्ये जपली जाणार नाहीत तर देशातील महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत अहिल्या देवींचे योगदान लोकांसमोर आणण्याचा प्रयत्नही होईल.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संपूर्ण देशाच्या संस्कृतीचे प्रतीक:

यावर आमदार पडळकर म्हणाले, 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या संस्कृतीचे प्रतीक आहेत. त्यांचे सामाजिक सुधारणा कार्य, न्यायव्यवस्थेतील पारदर्शकता आणि जनतेप्रती असलेली निष्ठा आजही प्रेरणादायी आहे. म्हणूनच, त्यांची स्मृती जपणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.' पुण्यामध्ये होणारा हा कार्यक्रम अत्यंत भव्य स्वरूपाचा असणार असून यामध्ये विविध राज्यातील अनेक मान्यवर व्यक्ती, राजकीय नेते, अभ्यासक आणि अहिल्यादेवींचे अनुयायी सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती या कार्यक्रमाला वेगळेच महत्त्व प्राप्त करून देणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाची व्याप्ती देशभरात पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.