शनिवारी आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणव

फडणवीस-आदित्य भेटीनं खळबळ; शिंदेंच्या अडचणी वाढणार?

मुंबई: मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जवळ आल्याने राजकीय घडामोडी घडण्यास वेग आला आहे. अशातच, शनिवारी आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सूत्रांनुसार, बीकेसीतील सोफिटेल हॉटेलमध्ये ही भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस मुंबईतील बांद्रा पश्चिम येथील ताज हॉटेलमध्ये भेटले होते. अशातच, शनिवारी आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस एकाच हॉटेलमध्ये असल्याने चर्चांना उधाण आलंय. आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस सोफिटेल हॉटेलच्या 7 व्या मजल्यावर भेटले, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. 

हेही वाचा: ठाकरे ब्रँड बाजारात चालत नाही; मुनगंटीवारांचा ठाकरे बंधूंना टोला

आमदार आदित्य ठाकरे शनिवारी सायंकाळी 5.30 ते 6 दरम्यान हॉटेल सोफिटेल येथे दाखल झाले होते. काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील याच ठिकाणी पोहोचल्याची बातमी समोर आली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तब्बल अडीच तास चर्चा झाली. त्यामुळे, पडद्यामागे नेमकं काय घडत आहे? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. सूत्रांनुसार, भाजप कुठेतरी शिंदेंना डॅमेज करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच, शनिवारी सायंकाळी आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत वाढ होणार का? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.