मुंबई महापालिका निवडणुका ऐन तोंडावर आल्याने येत्या

मुंबईत 7 तारखेला काँग्रेसची महत्वाची बैठक

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नवनवीन घडामोडी घडत आहेत. अशातच, मुंबई महापालिका निवडणुका ऐन तोंडावर आल्याने येत्या 7 जुलै रोजी काँग्रेस पक्ष महत्वाची बैठक घेणार असल्याची घोषणा काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीथला यांनी सोमवारी केली. वरिष्ठ काँग्रेस नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हे वक्तव्य केले. 

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवास्थानी भेट घेऊन चेन्नीथला यांनी चर्चेची तपशीलवार माहिती दिली. 'आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मुख्यालयात ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. यात काँग्रेसच्या भविष्यातील रणनीतीवर, तसेच पक्ष संघटना मजबूत करण्याबाबत चर्चा झाली', अशी माहिती चेन्नीथला यांनी दिली. 

हेही वाचा: महापौर बंगल्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा मार्ग मोकळा

पुढे चेन्नीथला यांनी माहिती दिली की, 'महाराष्ट्रात पक्ष संघटन बळकट करण्यासाठी प्रत्येक महिन्याला अशा प्रकारच्या बैठकीचे आयोजन करण्यात येईल. यामध्ये राज्यातील वरिष्ठ नेते सहभागी होऊन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत काँग्रेस नेत्यांनी सोमवारी बैठकीत आपले विचार मांडले. मागील विधानसभा निवडणुकीत बनावट मतदान झाला'. 'महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची राजकीय व्यवहार समिती ७ जुलै रोजी मुंबईत बैठक घेणार असून, त्यात मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर की आघाडी करून लढवायची यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. लवकरच एक ''चिंतन शिबिर'' ही घेतले जाईल', अशी माहिती चेन्नीथला यांनी दिली. 

राज ठाकरेंच्या विधानाशी काँग्रेस सहमत नाही - चेन्नीथला

उत्तर भारतीयांविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका मांडली होती, अशी आठवण करून देताच रमेश चेन्नीथला यांनी प्रतिक्रिया दिली की, 'उत्तर भारतीयांना मुंबईतून हाकलून लावण्याबाबत राज ठाकरे यांच्या विधानाशी काँग्रेस सहमत नाही'. या बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यसभा खासदार रजनी पाटील, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते.