15 ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मां

Jitendra Awhad Meat Controversy: 'बापाचं राज्य आहे का?'; स्वातंत्र्यदिनी मांसविक्री बंदीवर जितेंद्र आव्हाडांचा संताप

ठाणे: 15 ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मांसविक्रीवर बंदी घालण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यासह, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रशासनावर टीका केली. या मुद्द्यावर भाष्य करताना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 'कोण कधी मांसाहार करावा हे पण सरकार ठरवणार का?'. 

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

'ठाणेमध्ये आल्यावर मला कळालं की कल्याण डोंबिवलीत एका आयुक्ताने अशी ऑर्डर काढली की, 15 तारखेला मांसविक्री करू नये. त्यांच्या बापाचं राज्य आहे का? काय चालू आहे? आता लोकांनी काय खावं आणि दुकानदारांनी काय विकावं याला कायद्याने काही बंदी आहे का? हा काय तमाशा आहे? किती द्वेषाची भावना पसरवायची आहे तुम्हाला?', असा सवाल शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला. पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 'आम्ही काय खावं आणि कोणत्या दुकानात जावं तेही स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी. या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्यादिवशीच तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून घेणार आहात का? हा काय तमाशा आहे?'.

'हे' आहे महापालिकेचे आदेश

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने असा आदेश दिला की, 15 ऑगस्ट रोजी मांसाची दुकाने बंद ठेवण्यात यावे. यासह, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने एका अधिसूचनेत असे म्हटले की, '14 ऑगस्टच्या रात्रीपासून ते 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत कत्तलखाने बंद राहतील'.