Sanjay Raut : 'रक्त आणि क्रिकेट एकत्र वाहतील का?'; राऊतांचा मोदी सरकारला सवाल
मुंबई: 9 सप्टेंबरपासून आशिया कप क्रिक्रेट सामन्याला सुरुवात होत आहे. अशातच, पाकिस्तानविरोधात खेळण्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाला पाठवल्याने देशभरात संतापाची साट उसळली आहे. अशातच, भारत-पाकिस्तान सामन्याला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवल्याने वाद निर्माण झाला आहे. नुकताच, एप्रिलमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात अनेकांनी आपले प्राण गमावले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते.
काही दिवसांपूर्वी, आमदार आदित्य ठाकरे यांनी पाकिस्तानविरोधात खेळण्यासाठी भारतीय संघाला पाठवण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अशातच, आता सरकारने पाकिस्तानसोबत खेळण्यास मान्यता दिल्यानंतर, खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून आगामी आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानशी खेळण्याची परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे. सरकारने दिलेली मंजूरी 'वेदनादायक आणि असंवेदनशील' असल्याचे खासदार संजय राऊतांनी म्हटले आहे.
रक्त आणि क्रिकेट एकत्र वाहतील का?
खासदार संजय राऊत म्हणाले की, 'पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेकांनी आपले प्राण गमावले आहे. अशातच, सरकारचा पाकिस्तानविरोधात खेळण्यासाठी भारतीय संघाला पाठवण्याचा निर्णय 'वेदनादायक आणि असंवेदनशील' आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात विधवा झालेल्या 26 महिलांचे दु:ख आणि त्यांच्या भावना तुम्ही विचारात घेतल्या गेल्या आहेत का?'. 'तुम्ही एकदा जाहीर केले होते की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, आता रक्त आणि क्रिकेट एकत्र वाहतील का?', असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. पुढे राऊत म्हणाले की, 'जर हा सामना महाराष्ट्रात झाला असता तर बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने तो उधळून लावला असता'.