मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी

'महाराष्ट्राच्या समृद्धीचा महामार्ग'; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना

नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे, म्हणजेच आमणे-इगतपुरी टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. यादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गावरून प्रवासही केला. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली, ज्यामध्ये ते म्हणाले की, '2014 नंतर स्वप्न पूर्ण झालं'. चला तर सविस्तर जाणून घेऊया काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले:

'जे स्वप्न आम्ही 2014 नंतर महायुतीचं सरकार आल्यावर बघितलं होतं, त्याची एक प्रकारे पूर्तता आज या ठिकाणी होत आहे. समृद्धी महामार्ग हा केवळ रस्ता नाही, हा महाराष्ट्राच्या समृद्धीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे,' अशी भावनिक प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पुढे फडणवीस म्हणाले की, 'वन्यजीवांसाठी जी संरचना केली आहे, वन्यजीवांना कुठेही संचार करताना अडचण होऊ नये, अडथळा होऊ नये म्हणून जवळपास शंभर वेगवेगळ्या संरचना येथे तयार केल्या आहेत. ज्यामध्ये पाहिल्याचं देशामध्ये वन्यजीवांसाठी 8 ओव्हरपास, 92 अंडरपास तयार करण्यात आले आहेत'.

समृद्धी महामार्गावर बनवलेल्या जोडभोगद्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली की, 'येथे दोन्ही भोगद्यांना जोडणारे जोडभोगदे तयार केले आहेत. जर एखाद्या ठिकाणी अपघात झाला आणि रेस्क्यू करायचं असेल, तर त्या जोडभोगद्यातून रेस्क्यू करता येतो, अशाप्रकारची व्यवस्था येथे केली आहे'.