महायुतीतील रायगड पालकमंत्रिपदाच्या वादाला नवा रंग;

Eknath Shinde Cabinet Meeting : महायुतीत शिवसेना नाराज? भरत गोगावलेंपाठोपाठ एकनाथ शिंदेंचीही मंत्रिमंडळ बैठकीला दांडी

मुंबई: राज्यातील महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळूनही सत्तेतील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना पुन्हा घडली आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून सुरु असलेला वाद आता थेट मंत्रिमंडळ बैठकीतही जाणवू लागला आहे. भरत गोगावले यांच्या अनुपस्थितीनंतर आजच्या कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील गैरहजर राहणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) वाद सुरू आहे. भरत गोगावले आणि आदिती तटकरे या दोघांनीही आपल्या-आपल्या पक्षाचा हक्क असल्याचा दावा केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरती स्थगिती जाहीर केली होती. स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणावरूनही याच मुद्द्याला वाचा फुटली आणि अखेर शासनाने आदिती तटकरे यांनाच रायगडमध्ये ध्वजारोहण करण्याची अधिकृत घोषणा केली.

या निर्णयानंतर भरत गोगावले यांनी आपण नाराज नसल्याचे सांगितले, मात्र ते आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या मते, दिल्लीचा दौरा पूर्वनियोजित असल्यामुळे अनुपस्थिती अनिवार्य होती. 'एका ध्वजारोहणाने पालकमंत्री ठरत नाही,' असा त्यांचा दावा असला तरी, वेळेची जुळवाजुळव बघता राजकीय संकेत वेगळेच असल्याची चर्चा सुरू आहे.

यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती अधिकच गोंधळ निर्माण करणारी ठरत आहे. शिंदे हे सध्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर असून, सोमवारी त्यांनी जम्मूमध्ये शिवसेना शिंदे गट आयोजित रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. त्यानंतर आज ते श्रीनगरमध्ये थांबणार आहेत. नेहमी दौऱ्यानंतर तातडीने मुंबईत परत येऊन शासकीय कामकाजात सहभागी होणारे शिंदे, यावेळी मात्र कॅबिनेट बैठकीला अनुपस्थित राहणार हे राजकीय दृष्ट्या लक्षणीय मानले जात आहे.

महायुतीत सत्ता वाटप, निर्णयाधिकार आणि प्रादेशिक पदांच्या वाटपावरून अस्वस्थता असल्याचे संकेत पूर्वीपासून मिळत होते. शिंदे गटाचे खच्चीकरण सुरू असल्याच्या चर्चेत आता या दोन नेत्यांची एकत्र अनुपस्थिती नवा रंग भरते आहे. विशेषतः, शिवसेना (शिंदे गट) हा सत्तेत असूनही महत्त्वाच्या पदांवर पकड कमी होत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

या सर्व घडामोडींमुळे दोन प्रश्न निर्माण झाले आहेत एक म्हणजे, शिंदे आणि गोगावले यांची अनुपस्थिती ही फक्त योगायोग आहे की नियोजित संदेश? आणि दुसरा म्हणजे, महायुतीत आंतरिक नाराजी किती खोलवर आहे? सध्या तरी अधिकृतपणे कोणीही नाराजी मान्य करत नसले, तरी राजकीय नाडी मोजणारे जाणकार म्हणतात, 'सत्ता मिळवणे सोपे, टिकवणे कठीण.'

येत्या काही दिवसांत रायगडच्या पालकमंत्रिपदावर अंतिम निर्णय, तसेच कॅबिनेट बैठकीत अनुपस्थित राहिलेल्या नेत्यांची भूमिका, या दोन्ही गोष्टी महायुतीच्या पुढील राजकारणाचा सूर ठरवतील. आत्तासाठी मात्र राज्याच्या राजकीय रंगमंचावर ही अनुपस्थिती चर्चेचा नवा विषय ठरली आहे.