महाराष्ट्रात बहुमतात असलेली महायुती बेजार झाली आहे

मंत्र्यांच्या कारनाम्यांमुळे महायुती अडचणीत

मुंबई: महाराष्ट्रात बहुमतात असलेली महायुती बेजार झाली आहे. ती मंत्र्यांच्या कारनाम्यांमुळे... कुणी मारहाण करतोय तर कुणी रमी खेळतोय.. विशेष म्हणजे अशा मंत्र्यांना सरकार पाठिशी घालतंय. 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अडचणी संपता संपत नाहीत. या अडचणींना कारण आहे, त्यांच्या नेत्यांचे आणि विशेषत: त्यांच्या मंत्र्यांचे कारनामे. इतर दिवशी तर सोडा पण अगदी विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असतानाही हे नेते, मंत्री काही थांबायला तयार नाहीत. आता या अतीपराक्रमी नेत्यांमुळे सरकारवर चोहोबाजूंनी टीका व्हायला लागली आहे आणि ही टीका थांबवण्यासाठी महायुतीच्या सरकारच्या नेत्यांमध्ये बैठकांचं सत्र सुरू झाले आहे. पण नेत्यांचे कारनामे इतके सर्वव्यापी आहेत की या बैठकांमधून त्याला आळा बसणार का प्रश्नच आहे.

हेही वाचा: पीडित विजय घाडगेंचा सूरज चव्हाणांवर गंभीर आरोप; काय म्हणाले विजय घाडगे?

कधी आमदारांचे कार्यकर्ते विधीमंडळाच्या दारात हाणामारी करतात, कधी आपल्याच घरात मंत्री पैशांनी भरलेल्या बॅगासोबत वागवतात, कधी आमदार निवासात आमदार लुंगी बनियानवर बॉक्सिंग करतात, कधी भर पत्रकार परिषदेत नेते खासदारांसमोर फ्री स्टाईल हाणामारी करतात. तर कधी विधानसभेत मंत्री मोबाईलवर रमी खेळण्यात मग्न असतात. गेल्या काही दिवसांतले महायुतीतल्या नेत्यांचे हे प्रताप आहेत. पार मंत्र्यांपासून ते आमदारांपर्यंत आणि पदाधिकाऱ्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सगळेजण यांत सहभागी आहेत. 

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर आहेत आणि लोकांच्या नजरेसमोर सत्ताधारी नेत्यांचे हे प्रताप आहेत. आता या परिस्थितीत निवडणूका लढायच्या तर उलटाच परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळेच महायुतीच्या नेत्यांनी आता डॅमेज कंट्रोल करायला सुरूवात केली आहे. भाजपचे प्रदेशअध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्यात आज एक बैठक पार पडली.

आमदार आणि मंत्र्यांचे बरेच कारनामे या विधिमंडळ अधिवेशनातच घडले. त्यामुळे भर विधानसभेतच मुख्यमंत्र्यांना या सगळ्या नेत्यांना समज द्यावी लागली होती. सध्या चर्चेत असलेले सगळे नेते हे एकतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत किंवा शिवसेनेचे आहेत. पण भाजपच्या नेत्यांकडून अशा चुका व्हायला नकोत यासाठी मुख्यमत्र्यांनी आपल्या नेत्यांचे कान टोचल्याची चर्चा आहे. शिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादीबाबत माध्यमांशी बोलणे टाळा अशाही सूचना दिल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला लवकरच एक वर्ष पूर्ण होईल. पण या वर्षभरात  वेगवेगळ्या नेत्यांच्या या पराक्रमांमुळे फडणवीस सरकारची डोकेदुख चांगलीच वाढली आहे. यावर देवेंद्र फडणवीस सरकार काय तोडगा काढणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष असेल.