Manoj Jarange Patil: 'सरकारनं तत्काळ जीआर काढावा, अन्यथा राज्यातील एकही मराठा...'; जरांगेंच्या मागणीवर समिती परतली, आझाद मैदानावर नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil: मराठवाड्यातील मराठा आणि कुणबी समाज एकच असल्याचा जीआर तत्काळ काढावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. जर हा निर्णय दोन-चार दिवसांत झाला नाही, तर राज्यातील एकही मराठा शनिवारी-रविवारी घरी राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधवांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरु केले आहे. पहिल्या दिवशी सरकारने आंदोलनाचा अंदाज घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी न्या. संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या समितीला जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाचारण करण्यात आले. शनिवारी दुपारी तीन वाजता समितीच्या अध्यक्ष संदीप शिंदे व सदस्यांनी जरांगे पाटील यांच्याशी अनेक मुद्यांवर चर्चा केली.
मनोज जरांगे पाटील यांनी बॉम्बे, औंध, सातारा आणि हैद्राबाद गॅझेटियर नोंदींचा आधार घेऊन तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, 1930 साली जालना जिल्ह्यात 97 हजार कुणबी होते; आता त्यांची संख्या पाच ते दहापटी वाढली असतानाही कुणबी कुठे गेले, याचा अभ्यास हवा. तसेच संभाजीनगरमध्ये 1 लाख 23 हजार कुणबी होते; आता कुठे गेले, हा प्रश्नही उपस्थित केला.
समितीचे अध्यक्ष न्या. शिंदे यांनी यावर युक्तिवाद केला की, गॅझेटियरमध्ये नोंदी आहेत परंतु नावे-आडनावे नसल्यामुळे कुणाची नोंद आहे हे तपासावे लागेल. यावर जरांगे पाटील म्हणाले की, 'मराठ्यांसाठीच गॅझेटियर आहे, मग त्यात नोंदी आमच्या नसतील तर कुणाच्या असतील?'
मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी समावेशाबाबत प्रश्न उपस्थित केला, 'जर सरधोपटपणे कुणबी दाखले वाटता येत नाहीत, तर सरधोपटपणे जाती ओबीसीत कशा जातात? ओबीसीत 350 जाती कशा गेल्या?' असे प्रश्न समितीसमोर ठेवले.
हेही वाचा: Maratha Reservation Meeting: मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू, काय तोडगा निघणार?
जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारला त्वरित निर्णय घेण्यास भाग पाडतील, असा अंदाज आहे. या आंदोलनामुळे मराठा समाजातील एकता आणि दबाव सरकारवर वाढेल, असे विश्लेषक सांगतात.
मराठा आरक्षणाच्या अंतिम टप्प्यात येत असताना जरांगे पाटील यांचा इशारा आणि आझाद मैदानावर आंदोलनाची दृष्यं ही राज्यभरातल्या राजकीय चर्चेत महत्त्वाची ठरणार आहेत.