अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेड अध्यक्ष प्रवीण गायकवा

अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षांना काळं फासून निषेध

सोलापूर: अक्कलकोट येथे एका नागरिक सत्कार समारंभात संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासून तीव्र निषेध करण्यात आला. शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन करत गायकवाड यांच्यावर संताप व्यक्त केला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना श्री फत्तेसिंह शिक्षण संस्था व सकल मराठा समाज अक्कलकोट यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात घडली. या कार्यक्रमात प्रवीण गायकवाड यांना सन्मानित करण्यात येत होते. मात्र, कार्यक्रमादरम्यान शिवधर्म फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी अचानक व्यासपीठावर जाऊन गायकवाड यांच्यावर काळं फासलं. शिवधर्म फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार, संभाजी ब्रिगेडकडून स्वामी समर्थ यांच्याविषयी अपशब्द वापरण्यात आले आणि छत्रपती संभाजी महाराजांचा ऐकेरी उल्लेख करून हिंदू समाजाच्या भावना दुखावण्यात आल्या. त्यामुळे संतप्त शिवभक्तांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले. हेही वाचा: 'पैशाची चिंता नाही, एखादी बॅग... ; मंत्री संजय शिरसाटांचा आणखी एक व्हिडिओ समोर

शिवधर्म फाउंडेशनने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर संभाजी ब्रिगेडने आपल्या संघटनेच्या नावातून ‘छत्रपती संभाजी’ महाराजांचा ऐकेरी उल्लेख काढून टाकला नाही, तर त्यांना राज्यभर आंदोलनाचा सामना करावा लागेल. तसेच, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनासमोर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये शिवधर्म फाउंडेशनने आंदोलनाचा इशारा दिला आहे. स्वामी समर्थांच्या भूमीतच गायकवाड यांना काळं फासल्याने 'हा स्वामी समर्थांचा दिव्य न्याय' असल्याचे शिवभक्त कार्यकर्त्यांनी सांगितले.

सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.