'संजय राऊतांच्या मायचा #@##'; संजय गायकवाडांची जीभ घसरली
मुंबई: 9 जुलै रोजी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी आमदार निवासातील कँटीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. निकृष्ट जेवण दिल्यामुळे गायकवाडांनी कँटीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. यावर, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र, राऊतांबाबत बोलताना संजय गायकवाडांची अचानक जीभ घसरली. संजय गायकवाड यांनी मारहाण केलेला कॅन्टीनचा मॅनेजर शेट्टी आहे. यावरून संतप्त संजय गायकवाडांनी राऊतांना जोरदार टोला लगावला. 'मराठी मराठी करणाऱ्या संजय राऊतांना शेट्टींचा पुळका आला का?', असा सवाल संजय गायकवाडांनी केला.
'संजय राऊताच्या मायचा #@#' - संजय गायकवाड
'बाळासाहेब ठाकरे यांनी पहिले आंदोलन जे केले होते, ते साऊथ इंडियन लोकांच्या विरोधात केले होते. त्यांनी डान्स बार, लेडीज बार लावून संस्कृती बिघडवली. मी ज्याला मारहाण केली तो शेट्टीच आहे. इकडे मराठी मराठी करणाऱ्यांना पुळका आला का त्या शेट्टींचा? संजय राऊताच्या मायचा #@# आहे का तो शेट्टी?', असा संतप्त सवाल संजय गायकवाडांनी केला.
पुढे संजय गायकवाड म्हणाले की, 'मी काय त्याला आतंकवादी वाटतो का? तो आमच्या लोकांना बोगस जेवण खाऊ घालत होता. आज ते सिद्ध झाले. त्या हॉटेलवाल्याने 79 प्रकाराच्या नियमाचे उल्लंघन केल्याचे सिद्ध झाले. हा माझा विजय आहे. त्याला कुणी वाचा फोडत नव्हते. घंटा कुणी मांजराच्या गळ्यात बांधत नव्हते, तो मी बांधला. मला मान्य आहे की माझा मार्ग चुकीचा होता. इच्छा नसताना मला कायदा हातात घ्यावा लागला'.
'संजय राऊत हा एक नंबर नालायक' - संजय गायकवाड
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंबद्दल मोठा खुलासा केला होता. संजय राऊतांनी असा दावा केला होता की, एकनाथ शिंदेंनी अमित शहांना सांगितले होते की जर त्यांनी मला मुख्यमंत्री केले तर आमचा गट भाजपमध्ये विलीन होईल. यावर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले की, 'संजय राऊत हा एक नंबर नालायक होपलेस माणूस आहे. यांच्या कोणत्या भागात ट्रान्स्लेटर फिट आहे की याला बातम्या कुठून लागतात. पक्ष वाढण्यासाठी एकनाथ शिंदे जीवाचे रान करून फिरतात. हे का पक्ष विलीन करण्यासाठी बोलतील. संजय राऊत बोलला की लोक टीव्ही बंद करतात'.