Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कुठे चालणार?
बीड: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अद्यापही गूढ कायम आहे. काही महिन्यांपूर्वी दिव्यंगत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. यानंतर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून अनेक मोर्चे काढण्यात आले. देशमुख कुटुंब देखील या मोर्च्यांमध्ये सहभागी झाले. त्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागून आहे ते म्हणजे सरपंच देशमुख हत्या प्रकरणाच्या खटल्याकडे. दिव्यांगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा खटला नेमकं कुठे चालणार याचा निर्णय आज होणार आहे.संतोष देशमुख हत्ये प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात व्हावा अशी मागणी सीआयडीने केली होती. या याचिकेवरील आज जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. युक्तीवादावेळी दोन्ही वकिलांनी बीडच्या मुख्य न्यायाधीशांसमोर आपले मुद्दे मांडले. दोन्ही वकिलांच्या युक्तीवादानंतर कोर्टानं याबाबतचा निर्णय राखीव ठेवला.
हेही वाचा: खासदार सुप्रिया सुळेंचा कुणावर साधला निशाणा?
काय म्हणाले सरकारी पक्षाचे वकील बाळासाहेब कोल्हे? न्यायालयात खटला चालवत असताना प्रकरणातील साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो. घटनेतील आरोपी हे राजकीय आहेत, म्हणून दबाव आणला जाऊ शकतो. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खटला बीड न्यायालयात चालवावा. त्याचबरोबर आरोपींना बीडच्या जिल्हा कारागृहामधून केज न्यायालयात नेत असताना मस्साजोग हे गाव लागतं. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खटला बीड न्यायालयात चालवावा', अशी विनंती सरकारी वकील बाळासाहेब कोल्हेंनी केली.
काय म्हणाले आरोपीचे वकील अनंत तिडके आणि राहुल मुंडे? 'एसआयटीकडून करण्यात आलेला अर्ज तथ्यहीन आहे. हत्या प्रकरणातील आरोपी हे राजकीय नसून, त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचे पद नाही. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण होत असेल तर, केजच्या न्यायालयामध्ये व्हीसीची सुविधा आहे. त्याचबरोबर आरोपी बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये येत असताना दोन मार्ग आहेत. मस्साजोगचा मार्ग बदलून तेलगाव धारूर मार्गे देखील आरोपींना केसच्या न्यायालयात हजर करता येईल, असा युक्तिवाद बीडच्या न्यायालयात आरोपीचे वकील अनंत तिडके आणि राहुल मुंडे यांनी केला. त्याचबरोबर घटनेतील आरोपी वाल्मीक कराड हा केजचा नसून परळीचा आहे, म्हणून बीडच्या न्यायालयाऐवजी केज न्यायालयात ठेवण्यात यावा', अशी विनंती आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आली. दरम्यान या दोन्ही पक्षाची बाजू ऐकून कोर्टाने हा राखीव ठेवला असून सर्वांचेच याकडे लक्ष लागून आहे.