सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण – धनंजय मुंडेंना क्लीनचिटचे संकेत
मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंवर टीका – गुन्हेगारी टोळीला सुट्टी नाही
सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याचा मुद्दा गाजत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत मोठा सवाल उपस्थित केला आहे – "धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात का ठेवलं?" त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली आहे. जरांगे यांनी स्पष्ट इशारा दिला की, "सरपंच संतोष देशमुख खून, खंडणी, जमीन बळकावणे यासारखे गंभीर प्रकार घडले असतानाही सरकारने धनंजय मुंडेंना राजकीय आश्रय दिला. मात्र, त्यांच्या टोळीला भविष्यात सुट्टी नाही!"
सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर चार्जशीट दाखल झाली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे सहआरोपी ठरतील की नाही, यावर सस्पेन्स कायम आहे. जरांगे यांच्या म्हणण्यानुसार, या चार्जशीटमध्ये धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची शक्यता होती. मात्र, राजकीय दबावामुळे त्यांना वाचवण्यात आले.
सरकारने पद्धतशीरपणे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राजकीय मित्रांना वाचवले, असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. तसेच, संतोष देशमुख प्रकरणात फोडाफोडी होणार नाही, यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या नियुक्तीच्या दुसऱ्याच दिवशी चार्जशीट दाखल झाली आणि धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याची शक्यता धूसर झाली.
जरांगे यांनी सरकारवरही निशाणा साधला. "छुपा राजकीय अजेंडा राबवून गुंड वाचवला, मात्र प्रामाणिक सरपंचाला न्याय मिळू शकला नाही," असे ते म्हणाले. पुढील तपासात काही सहआरोपी ठरण्याची शक्यता आहे. मात्र, तसे झाले नाही, तर त्रासदायक टोळीविरोधात आम्ही कठोर भूमिका घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला.