शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर अजित पवारांच्या भेटीला! उपमुख्यमंत्र्यांनीचं स्पष्ट केले भेटीचं कारण
MLA Sandeep Kshirsagar Meets Ajit Pawar: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज जुन्नरमध्ये भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकचं खळबळ उडाली. परंतु, या भेटीनंतर अजित पवार यांनी संदिप क्षीरसागर यांच्या भेटीमागील कारण स्पष्ट केलं आहे. अजित पवार यांनी म्हटलं आहे की, 'मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री असून क्षीरसागर हे तेथील लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांनी तेथील पाणीप्रश्नासंदर्भात माझी भेट घेतली. आम्ही देखील विरोधी पक्षात असताना मतदारसंघातील कामासाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती.'
हेही वाचा - जयललिता यांची जप्त केलेली मालमत्ता तामिळनाडू सरकारकडे हस्तांतरित
सध्या बीड नगर परिषदेतील पाणी प्रश्न अतिशय गंभीर झाला असून उन्हाळा सुरू झाल्याने शहरातील सामान्य जनतेला नियमित पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार असल्यामुळे त्यांच्या कानावर बीड शहरांमधील पाणी प्रश्नासंदर्भात चर्चा केल्याचं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना क्षीरसागर यांनी सांगितले की, 'अतुल बेनके यांच्याशी संपर्क झाला असता त्यांनी सांगितले की, जुन्नर येथील बाजार समितीच्या कार्यालयात अजित दादा कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहे. त्यामुळे मी अत्यंत गंभीर बनलेल्या बीडच्या पाणी प्रश्नावर त्यांना भेटण्यासाठी आलो होतो,' असंही संदीप क्षीरसागर यांनी स्पष्ट केलं आहे.
तथापी, बीडमध्ये पाणीप्रश्न अत्यंत गंभीर झाला असून यासंदर्भात क्षीरसागर यांच्याशी चर्चा केली आहे. बीडचा पाणी प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले आहे.
धस-मुंडे भेटीनंतर संदीप क्षीरसागर व अजित दादा पवार यांच्या भेटीला विशेष महत्त्व -
नुकतीच भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात गेल्या दोन दिवसांपासून चर्चेला उधाण आले होते. सुरेश धस व धनंजय मुंडे तब्बल साडेचार तास भेटले होते. अशातच शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने काही राजकीय घडामोडी घडतात का? याकडे सर्वांचे लक्ष होते.