Sharad Pawar: 'देवाभाऊ शेतकऱ्यांकडे पाहायला तयार नाहीत, सरकारवर दबाव...'; पवारांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
Sharad Pawar On Devendra Fadanvis: राज्यात काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी वातावरण चांगलंच पेटल्याचे पाहायला मिळत आहे. कुणबी नोंद असलेल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारने जीआर काढला आहे. परंतु या जीआरनंतर राज्यात ओबीसी आणि मराठा समाज समोरासमोर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला राज्यात मुसळधार पाऊस आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहेत. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आज नाशिकमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात बोलताना शरद पवारांनी सरकारला इशारा दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार जर योग्य ते निर्णय घेत नसेल तर आम्हाला फक्त बघ्याची भूमिका घेता येणार नाही. ही फक्त सुरूवात आहे अशा शब्दात शरद पवार यांनी सरकारला इशारा दिला आहे.
काय म्हणाले शरद पवार? "महाराष्ट्राच्या जवळपास सर्व जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टी झाली आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांवर झाला आहे. संकट येत असतात. त्यावर मार्ग काढायचा असतो. ही जबाबदारी राज्य सरकार आणि केंद्र सरकारची असते. पण आपण शेतकऱ्यांकडे पाहायला आजच्या राज्यकर्त्यांना वेळ नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेल्या दोन महिन्यांत दोन हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी जीव का देतो? शेतकरी एवढी टोकाची भूमिका का घेतो? याचं कारण शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात मार्ग काढण्याची जबाबदारी सरकार घेत नाही", अशी टीका शरद पवारांनी केली.
पुढे बोलताना, "मी कृषीमंत्री होते. त्यावेळी यवतमाळमधील एका शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याचे समजले. तेव्हा मी अस्वस्थ झालो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी तत्कालीन पंतप्रधानांना विनंती केली की शेतकरी जीव देत आहेत. शेतकरी जीव का देतोय हे समजून घेतलं पाहिजे. तेव्हा मनमोहन सिंग होते. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघे यवतमाळला गेलो. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळी त्या शेतकऱ्याच्या पत्नीने संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानंतर आम्ही दिल्लीला गेलो आणि सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं. परंतु, आज काय परिस्थिती आहे?", असा सवाल शरद पवार यांनी केला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारवर दबाव आणला पाहिजे. देवाभाऊ तुम्ही सर्व महाराष्ट्रात तुमचे फोटो लावले. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेत असल्याचं तुम्ही देशाला दाखवलं. पण, देवाभाऊ शेतकऱ्यांकडे पाहायला तयार नाहीत. असं चित्र असेल तर आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. आम्ही सत्तेचा गैरवापर करत नाहीत. पण सरकार शेतकऱ्यांकडे दुलर्क्ष करत असेल तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.