Sanjay Raut : संजय राऊतांवर कारवाई करा, शिवसेनेची पोलीस आयुक्तांकडे मागणी
मुंबई: संजय राऊत यांनी नेपाळमध्ये सुरु असलेला हिंसाचार भारतात सुद्धा होऊ शकतो, असे विधान केलं होतं. त्यानंतर आता संजय राऊत यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 150 नुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदार संजय राऊत यांची अडचण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेऊन राऊत यांच्या विरोधात कारवाईची मागणी करणारे लेखी निवेदन दिले. यावेळी खासदार मिलिंद देवरा, आमदार तुकाराम काते, शिवसेना सचिव संजय मोरे, माजी खासदार संजय निरुपम, उपनेत्या शीतल म्हात्रे, प्रवक्त्या ज्योती वाघमारे, सुशिबेन शहा, आशा मामेडी, संजना घाडी, सुवर्णा करंजे, शिशिर शिंदे, तृष्णा विश्वासराव आदि पदाधिकारी उपस्थित होते.
भारती यांना भेटलेल्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आरोप केला की राऊत यांनी नेपाळमध्ये अलीकडील हिंसाचाराचा व्हिडिओ प्रसारित करून आणि भारतात अशाच प्रकारच्या अशांततेचा इशारा देऊन अराजकता निर्माण करण्याचा आणि अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भारती यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
शिष्टमंडळाच्या मते, अशा टिप्पण्या केवळ चिथावणीखोर नाहीत तर समाजात भीती आणि अस्थिरता निर्माण करण्याचा हेतू आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की राऊत यांनी वारंवार अविश्वास पसरवून निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था, प्रशासन आणि माध्यमांसह लोकशाही संस्थांना कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच राऊत लोकशाही मार्गाने यशस्वी होऊ शकत नाहीत म्हणून ते भडकवणाऱ्या भाषणांचा अवलंब करतात, त्यामुळे हिंसा होऊ शकते असा दावाही शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केला आहे.