मुलाखतीचा टीझर प्रदर्शित; उद्धव ठाकरे करणार मोठे गौप्यस्फोट
मुंबई: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा टीझर प्रदर्शित झाला आहे. ही मुलाखत सामना या मुखपत्राद्वारे घेण्यात आली होती. या प्रोमोनुसार उद्धव ठाकरे यावेळी मोठे गौप्यस्फोट करणार असल्याचे बोलले जात आहे.
ठाकरे गटाचे खासदार आणि सामनाचे संपादक राऊतांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. त्यासोबतच, एक्सच्या माध्यमातून संजय राऊत यांनी मुलाखतीचा प्रोमो प्रदर्शित केला आहे. ही मुलाखत 19 आणि 20 जुलै असं दोन भागात प्रसिद्ध होणार आहे. मुलाखतीदरम्यान, संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना अनेक रोखठोक प्रश्न विचारले. विशेष बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांनी देखील या प्रश्नांची उत्तरं अगदी बेधडकपणे दिली आहेत. या मुलाखतीदरम्यान, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्यावरही भाष्य केल्याचे दिसत आहे. त्यामुळे, या मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरे नेमकं काय गौप्यस्फोट करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मुलाखतीच्या प्रोमोत नेमकं काय?
मुलाखतीदरम्यान खासदार संजय राऊत उद्धव ठाकरेंना काही प्रश्न विचारताना दिसत आहेत. 'लोकसभा निवडणुकीत तुमचा विजय झाला, मात्र विधानसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरी झाली. यामागचं कारण काय?', असा प्रश्न संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारले. यावर, उद्धव ठाकरे म्हणाले की, 'ठाकरे म्हणजे सदासर्वदा एक संघर्ष आहे. हा संघर्ष मतलबी वाऱ्यासाठी नाही. तर आम्ही समाजासाठीच सगळं करत आहोत. माझ्या आजोबांपासून हे सगळं चालू आहे. बाळासाहेब ठाकरे होते. हा संघर्ष करण्यासाठी आदित्य ठाकरे आहे. मी आहे. आता राज ठाकरेदेखील सोबत आले आहेत'.