Thackeray Shivsena Dasara Melava: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार, राज ठाकरे उपस्थित राहणार का?
मुंबई: शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवतीर्थावर दसरा मेळाव्याची परंपरा असून यावर्षीही शिवतीर्थावर शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे 2 ऑक्टोबर रोजी दादरमधील शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. दसरा मेळाव्याला परवानगी देताना सरकारने 25 अटी घातल्या आहेत. यावेळी दसरा मेळावा अनेक अंगानी आकर्षण असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढल्या आहेत. गेल्या दोन महिन्यात चार वेळा या बंधूंच्या भेटी झाल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी हे दोन्ही बंधू एकत्र येऊन सामोरे जातील अशा चर्चा सुरु आहेत. दुसरीकडे, शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे.
राज ठाकरे दसरा मेळाव्याला उपस्थिती लावणार का? बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर तब्बल दोन ते तीन तास चर्चा झाली. यावेळी बैठकीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत, अनिल परब सुद्धा उपस्थित होते. विविध अंगानी ही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. मात्र ही बैठक कौटुंबिक असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे उपस्थिती लावणार का? याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा सिलसिला सुरु असल्याने दोन्ही बंधू एकत्र येऊन दसरा मेळाव्याला संबोधित करतील अशी शक्यता आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र मेळावा घेतला तर शिवसैनिकांसह मनसैनिकांसाठी सुद्धा पर्वणी असेल यात शंका नाही. दोन्ही नेत्यांच्या मनोमिलनानंतर राज ठाकरे यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना मनोमिलन करण्यासाठी आवाहन केलं होतं. त्यामुळे शिवसेना आणि मनसे पदाधिकारी एकत्र दिसू लागले आहेत.
दरम्यान, राज ठाकरे शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार की नाही? याबाबत चर्चा असतानाच खासदार संजय राऊत यांनी शक्यता नाकारली असली, तरी बुधवारी झालेल्या प्रदीर्घ बैठकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये दसरा मेळाव्यासंबंधी काही चर्चा झाली आहे का? अशी उत्सुकता आहे. तसेच जर दसरा मेळाव्यात दोन्ही बंधू एकत्र आल्यास युतीची घोषणा करतील का? अशा देखील चर्चा आहेत.