Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी केली देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका; म्हणाले, 'गरज असेल तेव्हा...'
मुंबई: मागील काही दिवसांपसून राजकारणात अनेक नवनव्या घडामोडी घडत आहेत. अशातच, उपराष्ट्रपतीपदासाठी इंडिया आघाडीने सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी बी. सुदर्शन रेड्डी उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी उपस्थित होते.
यादरम्यान, उद्धव ठाकरेंनी बी. सुदर्शन रेड्डी यांचा सत्कार केला. तेव्हा, उद्धव ठाकरे म्हणाले की, 'बी. सुदर्शन रेड्डी निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे'. यासह, उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीका
उद्धव ठाकरे म्हणाले की, 'देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन केला होता हे खरे आहे. त्यांनी माझा पक्ष चोरला, त्यांनी माझा पक्ष फोडला तरी त्यांच्या विनंतीला काही अर्थ आहे का? राष्ट्रपतीपदाची निवडणूक असताना मी न विचारता मतदान केले. मात्र, औपचारिकता म्हणून कोणीही माझे आभार मानले नाहीत. आता गरज असेल तेव्हा वापरा आणि जेव्हा गरज नसेल तेव्हा फेकून द्या, अशा पद्धतीलाच आता नाकारले पाहिजे'.
21 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत प्रतिक्रिया दिली होती. शरद पवार म्हणाले की, 'उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी काल फडणवीसांनी मला फोन केला होता'. शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली.
शरद पवार काय म्हणाले?
'काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला कॉल केला होता. त्यांनी मला विनंती केली की, तुम्ही उपराष्ट्रपतीपदासाठी सी.पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा. यावर, मी त्यांना सांगितलं की, सी.पी. राधाकृष्णन आमच्या विचारांचे नाहीत आणि आम्ही त्यांना पाठिंबा नाही देऊ शकत. आम्ही उपराष्ट्रपतीपदासाठी, बी. सुदर्शन रेड्डी यांचा अर्ज दाखल केला आहे', अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवारांनी दिली.