उदयनराजे भोसले यांच्या मागणीवर काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
रायगड: छत्रपती शिवाजी महाराज यांची 345 वी पुण्यतिथी आणि त्यासोबतच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या जिर्णोद्धारास 100 वर्षे पूर्ण झाल्यामुळे रायगडावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते.
या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13वे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काही मागण्या केल्या. यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या मागण्या मान्य केल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या महापुरुषांवर अपमानास्पद टीका-टिप्पणी किंवा कृत्य करणाऱ्यांवर सरकारने कडक कारवाई करायला हवी. त्यासोबतच, छत्रपती शिवाजी महाराज यांचा संपूर्ण इतिहास सरकारने प्रकाशित करावा', असं खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली. खासदार उदयनराजे भोसले यांच्या मागण्यांना मान्यता देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
खासदार उदयनराजे भोसले यांच्या मागण्या मान्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'खासदार उदयनराजे भोसले यांनी आज ज्या काही मागण्या केल्या, त्यासंदर्भात आमचं म्हणजेच प्रशासनासोबत बोलणं झालं आहे. यावर आम्ही सविस्तर चर्चा देखील केली आहे. महाराष्ट्राचे आराध्य देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जर कोणी अपमानास्पद टीका-टिप्पणी केली, किंवा अपमान केला, तर आपण त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार. त्यासोबतच, आम्हा सर्वांचं असं मत आहे की जो कोणी आपल्या महापुरुषांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करेल, त्याला कड्यावरून फेकून दिले पाहिजे. मात्र, आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो. त्यामुळे, लोकशाहीनुसार अशा गुन्हेगारांवर योग्य ती कारवाई केली जाईल. त्यासोबतच, आम्ही लोकशाहीनुसार कठोर नियम बनवण्याचा निर्णय देखील घेतला आहे'.
'राज्य सरकारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रमाण इतिहास तयार केला पाहिजे अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी या कार्यक्रमात केली आहे. ती मागणी आम्हालादेखील योग्य वाटते. त्यासाठी, राज्य सरकारच्या वतीने असा प्रमाण इतिहास तयार केला पाहिजे. निश्चितपणे हे काम आम्ही लवकरच हाती घेऊ', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
'या' आहेत खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख मागण्या:
1. छत्रपती शिवाजी महाराज, माँ जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांची निंदा करणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा व्हावी असा कायदा करावा. या प्रकरणात त्या व्यक्तीला जामीन मिळू नये.
2. राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांचा व्यापक इतिहास प्रकाशित करावा. यासाठी, विशेष सेन्सॉर बोर्डाची स्थापना देखील करावी.
3. दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक झाले पाहिजे, ही देखील शिवभक्तांची मागणी आहे.
4. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने शहाजीराजे भोसले यांच्या समाधीसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा.