पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कर्ज का दिले? एमआयएमचे नेते ओवैसींचा सवाल
नवी दिल्ली: भारतासोबत युद्ध पुकारणाऱ्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कर्ज कसे दिले? तसेच, कर्ज देण्याबाबतच्या बैठकीत अमेरिका, कॅनडा, जर्मनी यांसारखे देश गप्प का बसले? आणि कर्ज मंजूर कसे होऊ दिले? असा सवाल एआयएमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. पुढे ओवैसी म्हणाले की, 'पाकिस्तान या कर्जाद्वारे गरिबांचे कल्याण करण्याचा प्रयत्न करणार नाही किंवा पोलिओ निर्मूलनासाठी या कर्जाचा वापर करणार नाही, तर भारतावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांसाठी करेल'.
कोण देतात पाकिस्तानला पैसे?
1 - आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF): आतापर्यंत, पाकिस्तानला आयएमएफकडून अनेक बेलआउट पॅकेजेस मिळाले आहेत. जुलै २०२३ मध्येच, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पाकिस्तानसाठी ३ अब्ज डॉलर्सची स्टँडबाय व्यवस्था मंजूर केली होती.
2 - जागतिक बँक (WORLD BANK): जागतिक बँक पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात निधी देते. शिक्षण, आरोग्य, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यासाठी जागतिक बँकेकडून पाकिस्तानला नियमित निधी मिळत असतो.
3 - आशियाई विकास बँक (ADB): पाकिस्तानला पायाभूत सुविधा विकास, वीज प्रकल्प आणि वाहतूक व्यवस्था यासाठी आशियाई विकास बँक (ADB) देखील कर्ज देत असते. यासोबतच, चीन, सौदी अरेबिया, यूएई यांसारख्या देशांनीही पाकिस्तानला द्विपक्षीय कर्ज आणि मदत दिली आहे.