Champions Trophy 2025: इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान; ‘करो या मरो’ सामन्यात कोण बाजी मारणार?
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत आज (बुधवारी) इंग्लंड आणि अफगाणिस्तान संघ एकमेकांसमोर उभे टाकणार आहेत. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पराभव पत्करल्याने दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. इंग्लंडला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारावा लागला. तर अफगाणिस्तानचा पराभव दक्षिण आफ्रिकेने केला. त्यामुळे ‘ब’ गटात पिछाडीवर असलेल्या या दोन्ही संघांना गुणतालिकेत स्थान मजबूत करण्यासाठी हा सामना जिंकणं अनिवार्य आहे.
इंग्लंडच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध जोरदार प्रदर्शन केलं होतं. पण गोलंदाजांच्या सुमार कामगरीमुळे इंग्लंडचा दारूण पराभव झाला. त्यामुळे आजच्या सामन्यात इंग्लंडच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांनी दमदार पुनरागमन करणं गरजेचं आहे. जोफ्रा आर्चर आणि मार्क वुडसारख्या वेगवान गोलंदाजांना सुरुवातीच्या षटकांत विकेट्स घेण्यावर भर द्यावा लागेल. फिरकीपटू आदिल रशीद आणि मोईन अली यांच्याकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. अफगाणिस्तानच्या फलंदाजांविरोधात त्यांची फिरकी प्रभावी ठरू शकते.
अफगाणिस्तानचा आत्मविश्वास उंचावलेला अफगाणिस्तानने २०२३च्या वर्ड कप स्पर्धेत इंग्लंडचा धक्कादायक पराभव केला होता. त्यामुळे या ऐतिहासिक विजयाची प्रेरणा घेत ते आजच्या सामन्यात आत्मविश्वासाने मैदानात उतरतील. राशिद खान, नवीण उल हक आणि मुजीब उर रहमान यांच्यासारख्या गोलंदाजांना इंग्लंडच्या आक्रमक फलंदाजांना रोखावं लागेल. तर कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी, इब्राहिम झदरान आणि रहमत शाह यांच्यावर अफगाणिस्तान संघाच्या फलंदाजीची मदार असणार आहे.
हेही वाचा - IPL 2025 मध्ये इतिहास रचणार रोहित शर्मा; 450 T20 सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू होणार!
ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडच्या बेन डकेटने १६५ धावांची वादळी खेळी केली होती. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. त्याला जो रूटने उत्तम साथ दिली होती. पण आजच्या सामन्यात फिल सॉल्ट आणि हॅरी ब्रूक यांच्यासारख्या युवा खेळाडूंना चांगली खेळी करावी लागणार आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर मधल्या फळीत धडाकेबाज खेळी करण्यासाठी ओळखला जातो. त्याला अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंच्या गोलंदाजीचा सामना करताना आपली छाप सोडावी लागणार आहे.
इंग्लंडचा संघ कागदावर अधिक बलाढ्य वाटतो. पण अफगाणिस्तानने अलीकडच्या स्पर्धांमध्ये मोठमोठ्या संघांना धक्के दिले आहेत. इंग्लंडच्या संघाला जर विजय मिळवायचा असेल तर गोलंदाजांनी सुधारणा करणे अत्यावश्यक आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानला हा सामना जिंकून आपली प्रतिभा दाखवून देण्याची मोठी संधी आहे.
हेही वाचा - विराट कोहलीची फूड डायरी- 'हे' आहेत आवडते रेस्टॉरंट्स!
उभय संघातील या सामन्याला दुपारी २.३० वाजता सुरूवात होणार आहे. तर याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स २, स्पोर्ट्स १८-१, जिओहॉटस्टार अॅपवर होणार आहे. दरम्यान, आजचा सामना दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’ या स्थितीतील आहे. यामुळे दोन्ही संघ आजचा सामना जिंकून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्याच्या दृष्टीने मैदानात उतरतील.