Asia Cup 2025: पाकिस्तानशी सामना? शहिदांच्या भावना विसरला आहात का? संसदेत ओवैसींचा सवाल
Asia Cup 2025: आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुचर्चित सामना 14 सप्टेंबर रोजी रंगणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी या सामन्यावरून केंद्र सरकारवर थेट सवाल उपस्थित केला आहे.
पाहलगाममध्ये घडलेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर अवघ्या पाच महिन्यांत पाकिस्तानशी क्रिकेट सामना खेळणे हे नैतिकदृष्ट्या चुकीचे असल्याचा ठाम सूर ओवैसी यांनी संसदेत लावला. लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर झालेल्या खास चर्चेदरम्यान बोलताना त्यांनी भावनिक पद्धतीने प्रश्न उपस्थित केला 'जेव्हा आपण पाकिस्तानच्या विमानांना आकाशात प्रवेश देत नाही, त्यांच्या बोटी समुद्रात येऊ शकत नाहीत, व्यापार बंद केला आहे, मग क्रिकेट कसला?' ओवेसी पुढे म्हणाले, 'आपण म्हणतो की रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही, आपण 80 टक्के पाणी थांबवले, मग तुम्ही क्रिकेट सामन्यात कसं सहभागी होणार?' त्यांनी हा मुद्दा 'सामान्य जनतेच्या भावना' आणि 'शहिदांच्या सन्मानासाठी' महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारला टोला लगावला की, 'सरकारकडे ते 26 शहीदांच्या कुटुंबीयांना सांगण्याची हिंमत आहे का, की आपण बदला घेतला आहे आणि आता पाकिस्तानशी सामना बघा?'
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना केवळ क्रीडा उत्सव नसतो, तर त्याला राजकीय, सामाजिक आणि भावनिक वजनही असते. त्यामुळे अशा काळात जेव्हा दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे, तेव्हा क्रिकेटसारख्या मोठ्या मंचावर दोन्ही देश आमनेसामने येणे, हा अनेकांसाठी संवेदनशील मुद्दा ठरतो.
आशिया कपमध्ये एकूण आठ संघ सहभागी होणार असून, भारत-पाकिस्तान सामना गट टप्प्यात 14 सप्टेंबरला पार पडणार आहे. या दोन्ही संघांची ‘सुपर फोर’ फेरीतही टक्कर होण्याची शक्यता आहे आणि जर दोघं अंतिम फेरीत पोहोचले, तर हा तिसरा सामना देखील घडू शकतो.