AFG vs SA : रिकल्टनचं शतक, रबाडाचा कहर! दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानवर मोठा विजय मिळवला. कराची येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात रायन रिकल्टनच्या शानदार शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 315 धावांचा डोंगर रचला आणि त्यानंतर गोलंदाजीत कगिसो रबाडा व लुंगी एनगिडी यांच्या भेदक गोलंदाजीच्या मदतीने अफगाणिस्तानचा डाव 208 धावांतच गुंडाळला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंड आणि भारत यांच्या पाठोपाठ स्पर्धेत विजयी सलामी दिली.
नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा टोनी डी झोरजी अवघ्या 11 धावांवर बाद झाला. त्यानंतर रायन रिकल्टनने संयमी आणि भेदक फलंदाजी करत एक बाजू लावून धरली. त्याने 106 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकार ठोकत 103 धावांची दमदार खेळी केली.
कर्णधार टेंबा बवुमा आणि रासी व्हॅन डर डुसेन यांनीही मोलाचे योगदान दिले. बवुमाने 58 धावा केल्या तर व्हॅन डर डुसेनने 52 धावा जोडल्या. या जोडीने संघाच्या धावसंख्येत महत्त्वाचा वाटा उचलला. त्यानंतर एडन मार्करमने नाबाद 52 धावांनी खेळी करत संघाला तीनशेचा टप्पा गाठून दिला. अनुभवी डेव्हिड मिलर फेल ठरला. तो 14 धावांवर बाद झाला. मार्को यानसेन शून्यावर माघारी परतला तर वियान मूल्डरने नाबाद 12 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीने 10 षटकांत 49 धावा देत 2 बळी घेतले. फजलहक फारुकी, अजमतउल्ला झझाई आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 6 बाद 315 धावा केल्या.
विजयासाठी 316 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला चांगली सुरुवात झाली नाही. रहमानुल्ला गुरबाज 10 धावांवर बाद झाला तर इब्राहिम झादरानही केवळ 17 धावा करून माघारी परतला. मध्यल्या फळीतील फलंदाज सादिक उल्लाह (16), हसमतुल्लाह शाहिदी (0), अजमत उल्लाह ओमरजाई (18), मोहम्मद नबी (8), गुलबदिन (13), राशिद खान (18) आणि नूर अहमद (9) हे ठराविक अंतराने बाद झाले. अफगाणिस्तानकडून रहमत शाह याने एकहाती किल्ला लढवला. त्याने 92 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकारासह 90 धावा केल्या. पण त्याला दुसऱ्या बाजूने कोणाचीही साथ लाभली नाही. अखेरीस अफगाणिस्तानचा डाव 208 धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने प्रभावी मारा करत 3 बळी घेतले. लुंगी एनगिडी आणि वियान मूल्डर यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. तसेच मार्को यानसेन आणि केशव महाराज यांना प्रत्येकी 1-1 गडी बाद करता आला.