Pakistan National Anthem: सामन्यापूर्वी DJ ने पाकिस्तानच्या राष्ट्रगीताऐवजी वाजवले 'जलेबी बेबी' गाणं; गोंधळात पडले खेळाडू
Pakistan National Anthem: भारत-पाकिस्तान आशिया कप 2025 सामन्यापूर्वी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर एक मोठी चूक घडली. पाकिस्तान संघ राष्ट्रगीतासाठी रांगेत उभा असताना, डीजेच्या चुकीमुळे 'पाक सरजमीन शाद बाद' ऐवजी टेशर आणि जेसन डेरुलो यांचे लोकप्रिय गाणे ‘जलेबी बेबी’ स्टेडियमच्या स्पीकर्सवर वाजले. जवळपास सहा सेकंद ही चूक सुरू राहिल्यानंतर आयोजकांनी ती दुरुस्त केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राष्ट्रगीताऐवजी गाणं लागल्यानंतर पाकिस्तानचे खेळाडू काही सेकंदासाठी गोंधळले.
तथापी, राष्ट्रगीताऐवजी वाजलेल्या ‘जलेबी बेबी’ घटनेची चर्चा सामना संपल्यानंतरही सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. या गोंधळानंतर सुरू झालेल्या ग्रुप-ए सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 9 बाद 127 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांमध्ये कुलदीप यादव सर्वात प्रभावी ठरला. त्याने 3 विकेट घेतल्या आणि पुन्हा एकदा ‘सामनावीर’ ठरला. सलग दुसऱ्या सामन्यात त्याला हा मान मिळाला आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी आक्रमक खेळ दाखवला. अभिषेक शर्माने केवळ 13 चेंडूंमध्ये 31 धावांची धडाकेबाज खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने नाबाद 47 धावा (37 चेंडू) करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. टीम इंडियाने फक्त 15.5 षटकांत 3 गडी गमावून 131 धावा करत सामना सहज जिंकला. या विजयासह भारताने आशिया कपमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.