Vinesh Phogat: विनेश फोगाटच्या घरी लवकरच येणार नवा पाहुणा, सोशल मीडियावर दिली 'गुड न्यूज'
भारतीय कुस्तीपटू आणि जुलाना विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार विनेश फोगटने तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. अनेक सुवर्णपदके जिंकणाऱ्या विनेशने आई होण्याची आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिने पती सोमवीर राठीसोबतचा एक खास फोटो पोस्ट करत हा गोड आनंद चाहत्यांसोबत शेअर केला. त्यांच्या या पोस्टनंतर चाहत्यांपासून ते कुस्तीपटूंपर्यंत अनेकांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
विनेशने २०१८ साली सोमवीर राठीसोबत लग्न केले. दोघंही व्यावसायिक कुस्तीपटू असल्याने त्यांचं नातं आधीपासूनच खास होतं. पण त्यांच्या लग्नाची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी हिंदू परंपरेनुसार ७ नव्हे, तर ८ फेरे घेतले. हा आठवा फेरा ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी खिलाओ’ या शपथेचा होता. त्यामुळेच विनेश आणि सोमवीर यांचं नातं सामाजिक भान ठेवणाऱ्या खेळाडूंच्या जोडप्यांमध्ये वेगळं ठरलं.
हेही वाचा - ICC Champions Trophy 2025 : फायनल सामना रद्द झाल्यास कोण होईल विजेता? काय आहे ICC चा नियम
लग्नाच्या सात वर्षांनंतर आता त्यांचं कुटुंब वाढणार असल्याने फोगाट आणि राठी कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. विनेशच्या सासऱ्यांनीही ही आनंदाची बातमी दिली असून, "लवकरच आमच्या घरी एक छोटा पाहुणा येणार आहे," असं त्यांनी सांगितलं आहे.
बजरंग पुनिया आणि साक्षी मलिककडून शुभेच्छा विनेशच्या या गोड पोस्टवर अनेक दिग्गज खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या आहेत. बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी कमेंट करत अभिनंदन विनेश आणि सोमवीर असं लिहिलं आहे. यासोबतच कुस्तीपटू, राजकीय नेते आणि चाहत्यांनीही त्यांच्या या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा - ODI World Cup 2025: रोहित शर्माने रचला इतिहास. जाणून घ्या
ऑलिम्पिकनंतर राजकारणात प्रवेश विनेश फोगाटने कुस्तीमध्ये भारतासाठी मोठे योगदान दिले. पण पॅरिस ऑलिम्पिक २०२४ दरम्यान तिला मोठ्या धक्क्याला सामोरं जावं लागलं. निर्धारित वजनापेक्षा १०० ग्रॅम जास्त वजन असल्याने तिला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलं. यामुळे निराश झालेल्या विनेशने ऑलिम्पिकनंतर थेट कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर तिने हरियाणाच्या जुलाना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि काँग्रेसच्या तिकीटावर आमदार झाली.