भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या

पायाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर; ऋषभ पंत अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेतून बाहेर

Rishabh Pant out of series

IND vs ENG 4th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या रोमांचक कसोटी मालिकेदरम्यान, टीम इंडियासाठी एक मोठी आणि वाईट बातमी समोर आली आहे. मँचेस्टरमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. वृत्तानुसार, त्याच्या पायात फ्रॅक्चर झाले असून आता तो सध्याच्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून पंतवर उपचार सुरू आहेत. ऋषभ पंतला सहा आठवड्यांची विश्रांती अनिवार्य असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे त्याच्या पुनरागमनाची शक्यता कमी झाली आहे.

ही घटना मँचेस्टरमध्ये चौथ्या कसोटीत घडली. जेव्हा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स याने टाकलेल्या एका वेगवान बाउन्सरमुळे पंत जखमी झाला. चेंडू थेट पायावर लागल्याने पंत मैदानातच वेदनेने तडफडत पडला. वैद्यकीय पथकाने तत्काळ हस्तक्षेप केला आणि त्याला गोल्फ कार्टने मैदानाबाहेर नेण्यात आले. सुरुवातीला किरकोळ दुखापत वाटली, पण एक्स-रे आणि स्कॅनमध्ये फ्रॅक्चरची पुष्टी झाली.

हेही वाचा -ICC चा मोठा निर्णय! भारताऐवजी 'या' देशात रंगणार कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना

पंतच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला अनुभवी यष्टीरक्षकाची आणि आक्रमक फलंदाजाची उणीव भासणार आहे. मधल्या फळीतील त्याचे स्थान लवकर भरून काढणे संघासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. ऋषभ पंतने आपल्या कसोटी कारकिर्दीत अनेक संस्मरणीय डाव खेळले आहेत. विशेषतः गॅब्बा कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्धची विजयी खेळी क्रिकेटप्रेमीच्या नेहमी स्मरणात राहिल. 

हेही वाचा - युजवेंद्र चहल आणि आरजे महवश लंडनमध्ये एकत्र; व्हिडिओ व्हायरल

ऋषभ पंत हा टीम इंडियाचा सर्वात विश्वासार्ह आणि आक्रमक फलंदाज आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने अद्याप पंतच्या जागी पर्यायी खेळाडूची घोषणा केलेली नाही. पंतच्या अनुपस्थितीमुळे उर्वरित मालिकेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.