Champions Trophy 2025: सेमीफायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का, धाकड फलंदाज दुखापतीमुळे बाहेर जाण्याची शक्यता!
ऑस्ट्रेलियन संघाने ICC Champions Trophy 2025 स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता ऑस्ट्रेलियाचा संघ अडचणीत आला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा महत्त्वाचा सलामीवीर फलंदाज मॅथ्यू शॉर्ट दुखापतग्रस्त झाला आहे. यामुळे तो सेमीफायनलचा सामना खेळण्याची शक्यता कमी आहे.
मॅथ्यू शॉर्ट हा ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज आहे. तो ट्रॅविस हेडसोबत सलामीला उतरतो. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात फिल्डिंग करताना त्याला दुखापत झाली. उभय संघातील हा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. पण त्याआधी शॉर्टने १५ चेंडूत २० धावांची खेळी करत ट्रॅविस हेडसोबत ४४ धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर मैदानावर फिल्डिंग करत असताना त्याला दुखापत झाली. ICC Champions Trophy स्पर्धेच्या नॉकआउट सामन्याआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार स्टीव्ह स्मिथने शॉर्टच्या दुखापतीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
हेही वाचा - विराट कोहलीची फूड डायरी- 'हे' आहेत आवडते रेस्टॉरंट्स!
शॉर्टच्या जागेवर कोणाला संधी? मिचेल मार्शच्या दुखापतीनंतर ऑस्ट्रेलियन संघाने युवा खेळाडू जेक फ्रेझर-मॅकगर्कला आपल्या ताफ्यात सामील केले होते. IPL मध्ये त्याने प्रभावी खेळी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. सलामीला आक्रमक फलंदाजी करणाऱ्या जेकला शॉर्टच्या जागी स्थान मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय ऑलराउंडर ॲरन हार्डी हा देखील एक पर्याय ठरू शकतो. तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ हार्डीवर देखील ऐनवेळी डाव खेळू शकतो. याशिवाय ऑस्ट्रेलियन संघ ट्रॅव्हलिंग रिझर्व्हमधील डावखुरा फलंदाज आणि फिरकीपटू कूपर कोनोलीलाही संघात समाविष्ट करू शकतो.
हेही वाचा - Champion Trophy 2025: वसीम अक्रम पाकिस्तान क्रिकेट संघावर चिडला..
ICC Champions Trophy स्पर्धेचा पहिला सेमीफायनल सामना ४ मार्च रोजी खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पराभूत करून सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. पण त्यानंतरचे दोन सामने पावसामुळे रद्द झाले. तरी देखील गुण तसेच नेट रनरेटच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरला आहे.