Smriti Mandhana Century : स्मृती मानधनानं 50 चेंडूंत ठोकलं शतक; मोडला विराट कोहलीचा 12 वर्षांचा विक्रम!
Smriti Mandhana Breaks Virat Kohli's Record : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (Ind vs Aus Women ODI) एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. डावखुरी फलंदाज असलेल्या स्मृतीने केवळ 50 चेंडूत धडाकेबाज शतक झळकावून विराट कोहलीचा विक्रम मोडला. स्मृतीचे हे विक्रमी शतक तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीचा पुरावा आहे, कारण काही दिवसांपूर्वीच तिने याच मालिकेत दुसऱ्या सामन्यात 117 धावांची शतकी खेळी केली होती. या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका (ODI Series) जिंकण्याची आशा कायम ठेवली आहे.
स्मृतीची वादळी खेळी या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 413 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. हे आव्हान पेलताना भारतीय संघाची सलामीवीर स्मृती मानधना मैदानावर उतरली आणि तिने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच हल्लाबोल केला. तिने केवळ 50 चेंडूत शतक पूर्ण करत विराट कोहलीचा 10 वर्षांहून अधिक काळ असलेला विक्रम मोडला. स्मृतीच्या या खेळीत 14 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. महिला क्रिकेटच्या वनडे प्रकारातील हे दुसरे सर्वात वेगवान शतक आहे. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगने 45 चेंडूत शतक झळकावले होते.
हेही वाचा - IND W vs AUS W: भारतीय संघ गुलाबी जर्सी घालून तिसरा एकदिवसीय सामना खेळणार; काय आहे यामागील खास कारण?
ऑस्ट्रेलियाची दमदार फलंदाजी दिल्लीच्या अरुण जेटली आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Arun Jaitley International Cricket Stadium) सुरू असलेल्या या सामन्यात, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 412 धावांचा डोंगर उभा केला. ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बेथ मूनीने 75 चेंडूत 138 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. तिच्या या वादळी खेळीत 23 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. तिला जॉर्जिया वॉलने (81) आणि एलिसा पेरीने (68) चांगली साथ दिली. भारतीय संघाकडून अरुंधती रेड्डीने 3 बळी घेतले, तर रेणुका सिंग आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.