टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरूवात होणार आहे. उभय संघातील पहिला सामना आज नागपुरात होत आहे. या सामन्यावर सर्व क्रिकेट प्रेमींच्या नजरा लागलेल्या आहेत. यात खासकरून विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष आहे. मागील काही महिन्यांपासून खराब फॉर्मशी झगडत असलेल्या विराटसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कोहलीला पुन्हा फॉर्ममध्ये परतण्याची या मालिकेच्या माध्यमातून चांगली संधी आहे.
आजच्या सामन्यात जर विराट कोहलीने ९४ धावा केल्यास तो वनडे क्रिकेटमध्ये १४ हजार धावांचा मनसबदार होईल. हा टप्पा गाठणारा जगातील तिसरा खेळाडू बनेल. आतापर्यंत केवळ सचिन तेंडुलकर आणि श्रीलंकेचा डावखुरा फलंदाज कुमार संगाकारा यांनी हा पराक्रम केला आहे. विराटने जर ९४ धावा पूर्ण केल्या, तर तो ३०० पेक्षा कमी डावांमध्ये म्हणजे २८४ डावांत हा विक्रम गाठणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरेल.
विराटच्या निशाण्यावर सचिन-संगकाराचा विक्रम
सचिन तेंडुलकरने वनडे मध्ये ३५० डावात १४ हजार धावा केल्या होत्या. तर कुमार संगाकराने १४ हजार धावा करण्यासाठी ३७८ डाव खेळले. विराट हा टप्पा ३०० डावाच्या आत करू शकतो. त्यामुळे तो सर्वांत वेगवान फलंदाज ठरू शकतो.
विराटचे ७ महिन्यांनंतर वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन
विराट कोहली तब्बल ७ महिन्यांनंतर वनडे क्रिकेट खेळणार आहे. त्याने शेवटचा वनडे सामना २०२४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. आता इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेतून तो पुनरागमन करत आहे. १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होत आहे. त्यामुळे या मालिकेत विराटला त्याचा फॉर्म परत मिळवण्यासाठी सुवर्ण संधी आहे. विराटला फॉर्म गवसला तर टीम इंडियासाठी ही अत्यंत आनंदाची बाब असणार आहे. दरम्यान, नागपूरच्या मैदानावरील खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असल्याचा इतिहास आहे. त्यामुळे विराट आज मोठी खेळी करेल, अशी आशा संपूर्ण क्रिकेट रसिकांना आहे.