IPL 2025: राजस्थान रॉयल्सचे हेड कोच राहुल द्रविड कुबड्यांच्या आधाराने पोहोचले संघाच्या कॅम्पमध्ये, पाहा VIDEO
IPL 2025 Rahul Dravid Video: इंडियन प्रीमियर लीगच्या 18 वा सीझन येत्या 10 दिवसांत सुरू होईल. 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल 2025 च्या तयारीसाठी सर्व 10 फ्रँचायझींचे प्री-सीझन कॅम्प सुरू झाले आहेत. दरम्यान राजस्थान रॉयल्स संघाचे हेड कोच राहुल द्रविड यांचा कॅम्पमधून एक व्हीडिओ समोर आला आहे. गाडीतून उतरून ते कुबड्यांच्या साहाय्याने चालत आल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्याआधी राजस्थान रॉयल्सने द्रविड यांच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती त्यांचा फोटो शेअर करत दिली होती.
राजस्थान रॉयल्स संघाच्या सराव सत्रादरम्यान राहुल द्रविड पोहोचले, तेव्हा प्रथम ते गोल्फ कार्टच्या गाडीमध्ये बसून आले, त्यानंतर जेव्हा द्रविड खाली उतरले तेव्हा त्यांना चालण्यासाठी कुबड्यांचा आधार घ्यावा लागला. द्रविड यांचा हा व्हिडिओ राजस्थान रॉयल्सने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
हेही वाचा - भांगडा ऑन फायर! हार्दिक-सिद्धूचा विजयानंतरच्या जल्लोषाचा व्हिडीओ व्हायरल
आयपीएल 2025 च्या सीझनमध्ये भारताच्या क्रिकेट संघाचे माजी हेड कोच राहुल द्रविड आता राजस्थान रॉयल्सच्या हेड कोचच्या भूमिकेत असतील. प्रशिक्षणादरम्यान, जेव्हा द्रविड खुर्चीवर बसले होते तेव्हा त्यांनी दुसरा पाय समोरच्या खुर्चीवर सरळ ठेवला होता. द्रविड राजस्थान संघातील युवा खेळाडूंना भेटले. या वेळी, यशस्वी जैस्वालसह फलंदाजीबाबत चर्चा करतानाही दिसले. तेव्हाही ते कुबड्यांसह उभे राहिलेले दिसले.
राहुल द्रविडला कधी झाली दुखापत? बंगळुरूमध्ये क्रिकेट सामना खेळताना राहुल द्रविड यांच्या पायाला दुखापत झाली होती. राजस्थान रॉयल्सने त्यांच्या दुखापतीबाबत माहिती दिली होती. तसेच, ते बरे होत असल्याबद्दलही माहिती देण्यात आली होती. दुखापत पूर्ण बरी होण्यापूर्वीच ते राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात राहुल द्रविड सामील झाले आहेत.
आयपीएलच्या 18 व्या सीझनमध्ये सर्वच संघांचे चित्र बदलले असणार आहे. राजस्थान रॉयल्स संघाचेच नेतृत्व संजू सॅमसन करणार आहे. संघात नवे खेळाडू पाहायला मिळू शकतात. या हंगामात अनेक खेळाडूंची अदलाबदली झालेली पाहायला मिळणार आहे. राजस्थान रॉयल्सचा हंगामातील पहिला सामना 23 मार्चला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. यानंतर राजस्थानला कोलकाता आणि चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धचे आपले पुढचे 2 सामने गुवाहाटीच्या मैदानावर खेळायचे आहेत.
हेही वाचा - Vinesh Phogat: विनेश फोगाटच्या घरी लवकरच येणार नवा पाहुणा, सोशल मीडियावर दिली 'गुड न्यूज'