China Masters 2025: थायलंडच्या खेळाडूवर विजय मिळवून पीव्ही सिंधूचा क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश
China Masters 2025: भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने चायना मास्टर्स 2025 मध्ये महिला एकेरीत प्री-क्वार्टर फायनलमध्ये दमदार कामगिरी करत आपले स्थान निश्चित केले आहे. सिंधूने थायलंडच्या सहाव्या क्रमांकाच्या पोर्नपावी चोचुवोंगला सरळ दोन सेटमध्ये पराभूत करत सामना फक्त 41 मिनिटांत संपवला. पहिला सेट सिंधूने 21-15 ने जिंकला, तर दुसरा सेटही 21-15 च्या फरकाने जिंकला.
सिन्धूच्या विजयाने भारतीय चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कारण तिने हाँगकाँग ओपन 2025 मधील पहिल्या फेरीतील पराभव विसरून आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित केले. सध्या जगात 14व्या क्रमांकावर असलेली सिंधू आता क्वार्टर फायनलमध्ये अन से यंग आणि मिया ब्लिचफेल्ड यांच्यातील विजेत्याशी सामना करेल. सिंधूने दोन्ही सेटमध्ये थायलंडच्या खेळाडूला कोणताही पुनरागमन करण्याची संधी दिला नाही.
दरम्यान, पुरुषांमध्ये भारताची नंबर 1 जोडी सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टीने देखील चायना मास्टर्स 2025 मध्ये प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी राउंड ऑफ 32 मध्ये मलेशियाच्या जुनैदी आरिफ आणि राय किंग यांचा 42 मिनिटांच्या सामन्यात 24-22, 21-13 ने पराभव केला. या विजयाने त्यांच्या जोडीच्या स्थिरतेचे आणि सामन्यातील अनुभवाचे प्रदर्शन केले आहे.
हेही वाचा - Jasprit Bumrah: ओमानविरुद्ध सामन्यात बुमराह खेळणार नाही? भारतीय संघ व्यवस्थापनाचा मोठा निर्णय
दरम्यान, हाँगकाँग ओपनच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या लक्ष्य सेनला चायना मास्टर्स 2025 मध्ये पहिल्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी सुमारे 30 मिनिटे चाललेल्या सामन्यात टोमा ज्युनियर पोपोव्हकडून 11-21, 10-21 ने सरळ सेटमध्ये पराभव पत्कारला. चायना मास्टर्स 2025 मधील या भारतीय खेळाडूंच्या कामगिरीने देशातील बॅडमिंटन चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. पीव्ही सिंधू, सात्विक-चिराग आणि इतर भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवणे आता प्रेक्षकांसाठी रोमांचक ठरणार आहे.