'माझी बायको बघत असेल…' रोहित शर्माचं स्मृती मंधानाच्या 'त्या' प्रश्नावर उत्तर, सर्वांनाच आलं हसू
मुंबई : बीसीसीआय नमन अवॉर्ड्स 2024 चा पुरस्कार सोहळा शनिवारी 1 फेब्रुवारीला पार पडला. या सोहळ्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंपासून ते भारतीय संघाचे आजी माजी क्रिकेटपटू देखील हजर होते. यादरम्यान रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, स्मृती मंधाना आणि जेमिमा रोड्रीग्ज या खेळाडूंनी एकमेकांना काही मजेशीर प्रश्न विचारले. दरम्यान रोहितच्या उत्तराने सगळेच हसू लागले होते.
भारतीय संघाचा वनडे आणि कसोटी कर्णधार असलेला रोहित शर्मा किती गोष्टी विसरतो, हे अनेकांना ठाऊक असेल. हॉटेलमध्ये वस्तू विसरण्यापासून ते क्रिकेटच्या मैदानावर नाणेफेक जिंकल्यानंतर काय निवडणार आणि प्लेईंग इलेव्हनमध्ये कोण कोण खेळणार हे देखील रोहित कधीकधी विसरतो, ज्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झाले आहेत.
हेही वाचा - सानिया मिर्झाने दुबईतील घरातून शोएब मलिकचं नाव हटवलं, आता लिहिलंय 'या' व्यक्तीचं नाव
बीसीसीआय पुरस्कार सोहळ्यात स्मृती मंधाना रोहित शर्माला काही प्रश्न विचारत होती, यादरम्यान तिने विचारलं की, “असा कोणता छंद किंवा सवय आहे ज्यावरून तुझे इतर सहकारी तुझी मस्करी करतात.”
यावर उत्तर देताना रोहित म्हणाला, “मला माहित नाही, पण हे सगळे मी गोष्टी विसरतो त्यावरून मला चिडवतात. पण अर्थातच, हा काही छंद नाहीये. पण चिडवण्यावरून विचारलं तर, हे सर्व जण मला मी वस्तू विसरतो त्यावरून चिडवतात. मी माझं पॉकेट विसरतो, पासपोर्ट विसरतो याबद्दल सगळे बोलतात. पण हे सगळं खोटं आहे…” रोहितचे हे उत्तर ऐकून त्याचे सर्व टीममेट्स हसू लागले.
हेही वाचा - भारताने खेळवले चक्क १२ खेळाडू !
स्मृतीने रोहितचं उत्तर ऐकून आणखी एक प्रश्न केला की, “आतापर्यंतची सर्वात मोठी कोणती गोष्ट आहेस, जी तू विसरला आहेस?” यावर सुरूवातीला उत्तर देताना रोहित थोडा विचार करून म्हणाला, मी इथे सांगू शकत नाही, जर हा कार्यक्रम लाईव्ह सुरू असेल तर माझी पत्नी पण पाहत असेल. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मी माझ्यापाशी ठेवतो. रोहित शर्माच्या या उत्तराने पुन्हा एकदा सर्वच जण हसू लागले.
बीसीसीआयचे नमन अवॉर्ड्स 2024 मध्ये जसप्रीत बुमराहला सर्वोत्कृष्ट पुरूष क्रिकेटपटू आणि स्मृती मंधानाला सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात आला. बीसीसीआयने सचिन तेंडुलकरला जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं. याशिवाय, रविचंद्रन अश्विनला बीसीसीआयने स्पेशल अवॉर्ड दिलं.